हाऊसफुल्ल : अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न

>> वैष्णवी कानविंदे-पिंगे

समाजात राहताना आपण सगळ्यांचा विचार करून आपलं आयुष्य जगतो, पण त्यात आपल्या स्वतःच्या स्वतंत्र विचारांचं स्वातंत्र्य कधी हरवतं ते कळतच नाही. कधी कधी आपल्या स्वतःसाठी आपण काही निर्णय घ्यायची खूप गरज असते, पण आपल्या आजूबाजूच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली कुठलाही निर्णय वाटतो तितका सहज शक्य कधीच नसतो. जर तो निर्णय घेतला तर आयुष्याचा मार्ग कसा बदलू शकतो, आयुष्याकडून काहीएक अपेक्षा असताना नियती आयुष्याला कसं वळण देऊ शकते हे सगळं उलगडून दाखवणारा सिनेमा म्हणजे ‘एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी’.

नवदांपत्य, हसतं खेळतं घर. सगळंच आनंदात सुरू असतं. लग्नानंतर वर्षाच्या आतच गोड बातमीदेखील येते. त्या दोघांना, घरच्या सगळ्यांना मुलाची प्रचंड ओढही असते. सगळं सुरळीत सुरू असतं. दुसरीकडे एक हृदयरोगतज्ज्ञ आपलं काम चोख करत असते. तिची कीर्ती जगभर होत असते, पण अचानक ती डॉक्टर आणि हे जोडपं यांच्या आयुष्यात अशा काही घटना घडतात की, सगळ्या गोष्टींची समीकरणंच बदलतात. ती डॉक्टर आणि या दोघांचे मार्ग अचानक एकमेकांना छेदून जातात आणि मग काय होतं त्याची कथा म्हणजे हा सिनेमा. त्या डॉक्टरचा या दोघांशी संबंध काय असतो, अशा काय घटना घडतात की, ज्याने आयुष्याची उलथापालथ होते, निर्णय घेणं किंवा स्वतंत्र विचार करणं म्हणजे नेमवंâ काय आणि तो केल्याने काय होऊ शकतं, समाज आणि समाजात राहताना स्वतःचं अस्तित्व जपणं कसं शक्य असतं अशा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात येणार्‍या वळणावर हा सिनेमा भाष्य करतो.

मुळात या सिनेमाची गोष्ट चांगली आहे आणि त्याहूनही अधिक या सिनेमाने जो विचार मांडलाय तो महत्त्वाचा आहे. समाजात राहतोय याची जाणीव असणं आणि सगळ्यात स्वतःचे विचार जपणं या दोन बाबींमधली सूक्ष्म रेषा हा सिनेमा उलगडायचा नेमका प्रयत्न करतो. आपल्या पहिल्याच दिग्दर्शनातून दिग्दर्शक श्रीरंग देशमुख यांनी हा चांगला प्रयत्न केलाय. या सिनेमात अगदी छोट्या छोट्या गोष्टींचाही विचार केला जातो. म्हणजे व्यक्तिरेखा घडवताना त्याचा खूप सखोल विचार केलाय. उदाहरणार्थ, लग्न झाल्यावर भरल्या घरातही ज्यांनी ज्यांना हवं तसं राहावं. फॅशनेबल असो वा घरगुती याबाबत कोणाचाच साधा आक्षेपही नसतो, पण बाह्य रूपाबाबत उदार मत असणार्‍या घरातही नाजूक गोष्टींच्या बाबतीत मात्र पारंपरिक विचारच असतात. अंतर्बाह्य कात टाकणं अजूनपर्यंत शक्य होत नाहीय हे या छोट्याशा गोष्टीतून अगदी सहज दाखवलंय. अशाच अनेक गोष्टींचे बारकावे बर्‍यापैकी लक्षात ठेवून चित्रीकरण केलं गेलंय.

या सिनेमाला मिळालेली अभिनयाची साथही खूपच चांगली आहे. सुबोध भावे, शरद पोंक्षे, मुग्धा गोडबोले, श्रीरंग देशमुख, सीमा देशमुख, विक्रम गोखले इत्यादी नामवंत कलाकारांची कामं चांगली झाली आहेत. नवोदित अभिनेत्री कुंजिकाचा छापदेखील सिनेमावर पडतो, पण विशेष उल्लेख करायचा तर तो मधुरा वेलणकर या अभिनेत्रीचा. मोठ्या पडद्यावर बर्‍याच काळाने पुनरागमन करताना तिच्या वाट्याला दमदार भूमिका आलीय आणि ती तिने चांगली निभावलीय. म्हणजे इतक्या वर्षांनंतर पडद्यावर येताना  व्यक्तिमत्त्व, अभिनय, वावर या सगळ्यातच एक प्रगल्भता मधुराकडे पाहताना प्रकर्षाने जाणवते.

पण सिनेमाचा विचार जरी खरोखरच चांगला असला तरीही सिनेमामध्ये जो एक वेग अपेक्षित असतो तो मात्र या सिनेमात हरवल्यासारखा वाटतो. या सिनेमातल्या व्यक्तिरेखांच्या आयुष्यात नेमवंâ काय घडलेलं असतं हे जरी गुपित असलं तरीही पहिल्या अर्ध्या भागात ते सगळंच खूप खेचल्यासारखं वाटतं. त्यामुळे सिनेमावरची पकड थोडी निसरडी होते. दुसर्‍या अर्ध्या भागात मात्र सुरुवातीपासूनच ही पकड घट्ट होते आणि सिनेमा रंजक होतो, पण गुपित उलगडल्यानंतर त्याचा वेग खूप मंदावतो. जेव्हा निर्णयाची वेळ येते, अर्थात सिनेमाच्या उत्तरार्धात तर खूप जास्त हा सिनेमा बौद्धिक होतो. हा सिनेमा घडतो तो या कुटुंबाच्या आणि त्या डॉक्टरच्या अशा दोन परस्पर भिन्न पातळ्यांवर, पण ज्या विषयाचा प्रश्न इथे चर्चिला जातो, साधारण त्याचीच मीमांसा त्या दुसर्‍या घरात होते आणि बरीचशी दृष्यं अशी इथे एक तिथे एक लावल्यामुळे सिनेमात तोचतोचपणा जाणवायला लागतो. हे थोडं टाळता आलं असतं आणि संकलन अधिक नेमकेपणाने झालं असतं तर हा विषय नक्कीच आणखी खुलला असता.

या सिनेमाचं छायांकन चांगलं झालंय. कलाकारांच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे जपलेली स्टाईल या सगळ्या गोष्टी छान जमल्या आहेत. संगीतही चांगलं आहे. ज्या कविता वापरल्या आहेत, त्यातला अर्थपूर्ण आशय दृष्यांना नक्कीच साजेसा आहे, पण साधारण सगळं संगीत एकाच प्रकारचं झाल्याने त्यात थोडा वेगळेपणा असता तर अधिक रंजकता आली असती असंही वाटून जातं. अर्थात सिनेमाचा विषय, त्याची मांडणी आणि समाजाचं बाह्य आणि अंतरंग दाखवायचा जो प्रयत्न केलाय, आपल्या समाजाला छेदणार्‍या एका महत्त्वाच्या बोल्ड विषयाला मांडायचा जो प्रयत्न केलाय तो कौतुकास्पद आहे आणि त्यासाठी हा सिनेमा पाहायचा एक निर्णय प्रेक्षकांनी नक्की घ्यावा.

सिनेमा                        :           एक निर्णय… स्वत:चा स्वत:साठी!

दर्जा                          :           **1/2

निर्माता, लेखक, दिग्दर्शक  :           श्रीरंग देशमुख

छायांकन                     :           अर्चना बोर्‍हाडे

संगीत                        :           रोहन श्रीरंग देशमुख, कमलेश भडकमकर

कलाकार                    :           सुबोध भावे,  मधुरा वेलणकर-साटम, कुंजिका काळविंट,

                                          विक्रम गोखले, सुहास जोशी,  श्रीरंग देशमुख, सीमा देशमुख,

                                          मुग्धा गोडबोले-रानडे, मंगल केंक्रे शरद पोंक्षे,  प्रदीप वेलणकर