Movie Review : भीषण भविष्याचा संयत वेध ‘स्माईल प्लीज’

>>रश्मी पाटकर

माणूस जसजसा वैज्ञानिक प्रगती करू लागला आहे, तसतसे त्याच्यासमोरचे प्रश्न अधिक अवघड व्हायला लागले आहेत. त्याचं सर्वात भयंकर वास्तव म्हणजे माणसाला भेडसावणारे गंभीर आणि दुर्धर आजार. विज्ञानापासून ते अध्यात्मापर्यंत या आजारांवर कोणतेही खात्रीशीर इलाज नाहीत, हे जास्त भीषण आहे. मग, अशातून येते ती मानसिक-भावनिक हतबलता आणि हळूहळू येणारं रितेपण. अशाच एका गंभीर आजारावर प्रकाशझोत टाकणारा स्माईल प्लीज हा चित्रपट एका भीषण भविष्याचा वेध घेताना दिसतो.

कथेची सुरुवात होते, ती नंदिनी नावाच्या एका प्रथितयश फोटोग्राफरपासून. आपल्या कामाला वाहून घेणारी आणि त्यात यशस्वी होणारी नंदिनी घटस्फोटित आहे. नवरा शिशीरही हाही माध्यमकर्मी. एक नावाजलेला दिग्दर्शक म्हणून त्याची ओळख आहे. या दांपत्याला एक अडनिड्या वयाची नुपूर नावाची मुलगीही आहे, पण नुपूर आणि नंदिनीत आई-मुलीचं नातं दुभंगलेलं आहे. आपलं काम, नुपूरशी असलेलं नातं आणि म्हातारे वडील यांच्यात गुरफटलेल्या नंदिनीचं विश्व अचानक काहीसं उसवल्यागत होऊ लागतं. सगळ्या बाबतीत अत्यंत नेटकी असणारी नंदिनी हळूहळू छोट्या छोट्या गोष्टी विसरायला लागते. स्वतःमधले हे बदल तिचे तिलाच जाणवतात आणि ती थेट मानसोपचार तज्ज्ञाची मदत घेते. मानसोपचार करणारी तिची मैत्रीण तिला तिच्याबद्दल एक सत्य सांगते आणि नंदिनीचं विश्व 360 अंशात बदलून जातं. नंदिनीला डिमेन्शिया म्हणजे विस्मृती हा भयंकर आजार जडलेला असतो. तिच्या या आजाराची गंभीरता हळूहळू तिच्यासह तिच्या आजूबाजूच्यांनाही जाणवायला लागते. कधीकाळी आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावणारी नंदिनी आता एकलकोंडेपणाच्या कोशात जाऊ लागते. तिचा हा पुढचा प्रवास कसा असतो, या आजाराशी दोन हात करताना नंदिनीला काय अनुभव येतात आणि तिच्या आजूबाजूच्या मंडळींच्या जाणीवा कशा बदलतात, हे जाणून घेण्यासाठी चित्रपट पाहावा लागेल.

चित्रपटाची कथा एका गंभीर आजारावर बेतली असल्याने त्याला एक संथपणा आहे. पटकथेत अनेक त्रुटी आहेत. उदा. घटस्फोटित दांपत्याची लहानपणापासून मुलगी वडिलांकडे राहत असणे. त्यामुळे बघताना वारंवार अनेक गोष्टी खटकतात. पण, विषयाचं गांभीर्य कुठेही ढळू दिलेलं नसल्याने हाताळणी वरवरची वाटली तरी चित्रपटाचा तोल सुटत नाही. त्यामुळे कथा मनाला भिडते. मध्यंतरानंतर नंदिनीच्या आयुष्यातला विराज नावाच्या व्यक्तिचा प्रवेशही अतिशय संयमित आणि साचेबद्धता न ठेवता हाताळला आहे. त्याबद्दल दिग्दर्शकाचं अभिनंदन करायला हवं. तीच बाब अभिनयाची. मुक्ता बर्वे ही या चित्रपटाची खऱ्या अर्थाने नायिका आहे. कामात झोकून देणारी, आपल्या करिअरवर नितांत प्रेम असणारी, त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजणारी फोटोग्राफर ते अकाली आजाराने खचलेली, हळूहळू मनातून रिकामी होत जाणारी, संवेदना हरवत जाणारी आणि वास्तवातलं भान हरवत चाललेली व्यक्ती हा प्रवास अत्यंत ताकदीने वठवला आहे. विशेषतः तिच्या स्वप्नील डोळ्यांमध्ये पाझरत जाणारं रितेपण आणि शून्यात हरवेलला चेहरा तिने इतक्या सुंदर दाखवला आहे की ज्यांच्या आसपास डिमेन्शियाग्रस्त रुग्णांचा वावर आहे, त्यांना ही भूमिका आपली वाटू शकते. प्रसाद ओक याची शिशीर ही व्यक्तिरेखाही सुंदर लिहिली गेली आहे. अत्यंत तापट, अधिकार गाजवणारा, घटस्फोटित पत्नीच्या आजाराची जाणीव होऊनही तिच्याबद्दल म्हणावी तेवढी संवेदनशीलता ठेवू न शकणारा आणि प्रेमळ मनाचा बाप प्रसादने चपखलपणे उभा केला आहे. ललित प्रभाकर याच्या विराज नावाच्या पात्राचा प्रवेश मध्यंतरात होतो. पण त्याने भूमिकेवर चांगली पकड घेतली आहे. माणसांविषयी अत्यंत कनवाळू, अनाथ असूनही नात्यांच्या जाणीवा समृद्ध असलेली अशी त्याची व्यक्तिरेखा आहे. नंदिनीच्या आजाराने तिच्या हरवत चाललेल्या अस्तित्वाला तो अतिशय संवेदनशीलतेने हाताळतो, त्याने नाही म्हणायला प्रेक्षकाच्या मनात आशेचा अंकुर फुलतो. याखेरीज सतीश आळेकर यांनी साकारलेले नंदिनीचे वडीलही मनाला स्पर्शून जातात. नंदिनीची मुलगी दाखवलेली व्यक्तिरेखा मात्र भयानक आगाऊ आणि काहीशी ओव्हरस्मार्ट दाखवण्यात आली आहे. तिच्यात आईविषयी कळल्यानंतरचे होणारे बदल आणखी चांगल्या प्रकारे दाखवता आले असते, असं वाटून जातं.

पाहा चित्रपटाचा ट्रेलर-

इतर तांत्रिक बाबीही चोख आहेत. दिग्दर्शनाच्या बाबतीत म्हणायचं तर फॅशन डिझायनर विक्रम फडणीस यांचा दिग्दर्शक म्हणून हा दुसराच प्रयत्न आहे. त्यांनी डिमेन्शियासारख्या गंभीर विषयाला हात घातला आहे. या संपूर्ण चित्रपटात दिग्दर्शक म्हणून ते फारसे दिसत नाहीत. पण तरीही कुठेही काहीही भाष्य किंवा मत व्यक्त न करता त्रयस्थपणे हा विषय त्यांनी ज्या प्रकारे मांडलाय, तेच त्यांचं वैशिष्ट्य आहे. कोणतंही विधान न करता ते प्रेक्षकाला विचार करायला भाग पाडतात. या चित्रपटातली गाणी श्रवणीय आहेत.

स्माईल प्लीज हा चित्रपट एक भीषण व्यथा अतिशय संयतपणे मांडतो. डिमेन्शियाग्रस्त लोकांची संख्या आज जगभरात वाढत चालली आहे. दुर्दैवाने या आजारावर अद्याप कोणतंही खात्रीलायक औषध नाही. त्यामुळे रुग्णाला आजाराशी लढण्यासाठी स्वतःतीलच ताकद गोळा करावी लागते. त्यासाठी त्याच्या आजूबाजूच्या, त्याच्यावर नितांत प्रेम करणाऱ्या माणसांची त्याला सर्वाधिक गरज असते. अशा सोबतीने माणूस लढायला पुन्हा उभा राहतो, मग ती लढाई कितीही अजिंक्य असू दे, याची जाणीव हा चित्रपट करून देतो.

आपली प्रतिक्रिया द्या