करमणुकीचा उजाड

2048

>> वैष्णवी कानविंदे- पिंगे

एखाद्या व्यंगावर विनोदी भाष्य करत ती समस्या प्रेक्षकांसमोर मांडायचे आजवर अनेक प्रयत्न झाले आहेत. किंबहुना उत्तमरीत्या व्यंगात्मक गोष्ट हसत-खेळत समोर आणून अनेकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम बॉलीवूडने अनेक वेळा केले आहे आणि ते यशस्वीही झालेले आहे. पण ‘उजडा चमन’ या सिनेमातून अकाली टक्कल तत्त्वावर केलेलं भाष्य प्रमाणापेक्षा कितीतरी अधिक ‘उजाड’ झाल्यामुळे सिनेमा अजिबात रंगत नाही, उलट थोडा असह्य होतो.

ही गोष्ट तिशीत अकाली टकलेपणा आलेल्या एका तरुणाची आहे. टकलामुळे त्याचं लग्न होत नसतं. सगळेजण मस्करी करत असतात आणि तो हैराण झालेला असतो. त्यात ज्योतिषाने सांगितलं असतं की, वयाची एकतीस वर्षे पार पडली आणि लग्न झाले नाही तर आयुष्यभर लग्न होणार नाही. हे ऐकून त्याची अवस्था खूपच दयनीय होते. मग मुलगी मिळवण्यासाठी तो काय काय करतो, मुलगी मिळते का, लग्न होतं का, या सगळय़ांचा गडबड-गोंधळ-गुंता म्हणजे ‘उजडा चमन’ हा सिनेमा.

खरं सांगायचं तर हा विषय उत्तम होता. यात करण्यासही खूप काही होतं. मुख्य म्हणजे विनोद निर्मितीची शक्यता या विषयात प्रचंड होतीच, पण तरुण मुलांना भेडसावणारी अकाली टक्कल येण्याची समस्या प्रेक्षकाला स्वतःकडे खेचून घेण्यासाठी उत्तम होती. पण लेखक आणि दिग्दर्शक यांनी ही संधी सपेशल वाया घालवली आहे. यातले विनोद हे विनोदी कमी आणि जबरदस्तीने घडवलेले जास्त आहेत. म्हणजे एखादी जखम झाल्यावर त्यावरची खपली हळुवार हाताने काढणे आणि मुद्दाम खरवडून काढणे यात जो फरक तोच फरक या दोन सिनेमांतल्या विनोदात जाणवतो. काही बरे विनोद असले तरी ते चुकून झाल्यासारखे झाले आहेत.

बरं, सिनेमाची लांबी हा आणखी एक मुद्दा. उगाच खेचलेला. विषयाला आणि लांबीला कारण नसताना खेचलं गेलंय. सिनेमात चार गाणी आहेत, पण एकही गाणं लक्षात राहत नाही. उलट डोकेदुखीच जास्त होते.

अभिनयाच्या बाबतीतदेखील चांगले नवे चेहरे आणि नावाजलेले कलाकार असूनही काही फरक पडत नाही. मुख्य हीरो तर स्क्रिप्टमुळे ओव्हर ऑक्टिंग करतोय की काय असं वाटत राहतं. विषयाला हा सिनेमा स्पर्श करत असला तरीही दिग्दर्शन, लेखन, संगीत या सगळय़ाच बाबतीत हा प्रयत्न दुबळा पडतो. एकूणच हा सिनेमा म्हणजे करमणुकीच्या बाबतीत उजाडच राहिलाय असं म्हणणं अतिशयोक्तीचे ठरणार नाही.

सिनेमा उजडा चमन
दर्जा **(1/2)
निर्माता कुमार मंगल पाठक, अभिषेक पाठक
दिग्दर्शक अभिषेक पाठक
लेखक दानिश सिंग
संगीत गौरव – रोशिन, गुरू रंधावा
कलाकार सनी सिंग, मानवी गागरू, सौरभ शुक्ला, करिश्मा शुक्ला.

आपली प्रतिक्रिया द्या