Movie Review- वेडेपणाचा अतिरेक

3102

>> वैष्णवी कानविंदे-पिंगे

मंदीचे दिवस आहेत. त्यामुळे जमेल तिथे काटकसर केली पाहिजे आणि पैसे जपले पाहिजेत… असं मनापासून वाटत असेल तर या आठवडय़ात हमखास पैसे वाचवता येतील. सिनेमा बघण्यासाठी मल्टिप्लेक्सचं महाग तिकीट, मधल्या वेळेत खाण्याचे महाग पॉपकॉर्न, कोला असे सगळे खर्च या आठवडय़ात वाचू शकतात…त्यासाठी फक्त ‘पागलपंती’ या सिनेमाला जायचा मोह टाळायचा. पण त्यामुळे फक्त पैसेच नाही तर मनस्तापदेखील वाचेल ही आमची हमी!

हात लावू तिथे नुकसान करण्यात पटाईत असणाऱया तीन मित्रांची ही गोष्ट. त्यांचं नशीब इतकं वाईट असतं की, त्यांच्या वाटेत आलेल्या कोणत्याही गोष्टीचा बटय़ाबोळ होत असतो. अशातच त्यांची भेट एका डॉनशी आणि त्याच्या मेहुण्याशी होते. मग काय गोंधळ उडतात आणि आयुष्याचा सत्यानाश कसा होतो या सगळ्यांची गोष्ट ऊर्फ बिनडोक तमाशा म्हणजे पागलपंती हा सिनेमा.

जसं काठीला आमिष लावून आपण गळ टाकून बसतो. तसचं काहीसं या सिनेमाचं आहे. बडय़ा कलाकारांचं आमिष दाखवून सिनेमा पुढे केला गेलाय, पण खरंच यातला एकदेखील प्रभाव पाडू शकत नाही. खरं तर अनिस बजमी हे नावदेखील विनोदी धाटणीच्या सिनेमाकडे आकर्षित करण्यासाठी पुरे होतं, पण दुर्दैवाने त्याच्या स्वतःच्या सिनेमात त्यांनी इतका विनोदहीन बाज मांडला आहे की सिनेमा पाहताना अर्ध्यावर उठून जावं असं मनात आलं तरी आश्चर्य वाटायला नको. मुळात या सिनेमात काही बोटावर मोजण्याइतके विनोदी प्रसंग आहेत. पण ते इतके कमी आहेत की तब्बल अडीच तास लंबीच्या या सिनेमात ते कुठल्या कुठे नाहीसे होतात कळतदेखील नाही. अति अति ताणून सिनेमाची गंमत दिग्दर्शकाने शून्य करून ठेवली आहे. कोण कुठून येतं, का येतं, कधी येतं या कशाचा कशाला ताळमेळ नाही. गाणीदेखील यथा तथाच. एकूण या सिनेमाला ना कथा, ना पटकथा. संवाद ऐकताना विनोद कितीही शोधला तरी सापडतच नाही. या सिनेमाचं नाव जरी पागलपंती असले तरी प्रेक्षकांच्या सहनशीलतेचीदेखील मर्यादा असतेच की नाही… सिनेमा बघताना दिग्दर्शकाने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. फक्त आपल्याला आवडली म्हणून पाणी भरण्यात काय मजा आहे…

असो. तर या सिनेमाचं नाव पागलपंती आहे. त्याचा अर्थ वेडेपणा. पण हा सिनेमा म्हणजे वेडेपणाच असह्य कहर आहे. पुढचा आठवडा बरा जाण्यासाठी तो वेडेपणा टाळणं शहाणपणाचे ठरेल.

सिनेमा पागलपंती
दर्जा – *
निर्माता- भूषण कुमार, किशन कुमार, कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक
दिग्दर्शक- अनिस बजमी
लेखक- राजीव कौल, प्रफुल्ल पारेख, अनिस बाजमी
छायांकन- सुनील पटेल
कलाकार- अनिल कपूर, जॉन अब्राहम, इलियाना डिक्रुझ, अर्शद वारसी, उर्वशी रोटेला, पुलकित सम्राट, कीर्ती खरबंदा, सौरभ शुक्ल

आपली प्रतिक्रिया द्या