Movie Review- ‘वॉर’ अचंबित करणारा थरार, पण कथेत मार

2363

>> वैष्णवी कानविंदे-पिंगे

वॉर शब्दातूनच अभिप्रेत होतं ते युद्ध. पोस्टरवरती ऍक्शन हिरोज हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांची जोडी. पहिल्या क्षणातच हा सिनेमा नेमका काय असेल हे समजतं. प्रचंड धुमश्चक्री, तगडे फायटिंग सिक्वेन्स, डोळे दिपवतील अशी ऍक्शन दृश्ये आणि प्रचंड वेग असा हा सिनेमा आपले शीर्षक आणि प्रमुख कलाकार यांच्या नावाला दगा देत नाही. अर्थात काय घडणार, कसं घडणार हे प्रेक्षकाला सिनेमांच्या अनुभवाने बऱ्यापैकी ठाऊक असलं तरीही हा सिनेमा खिळवून ठेवण्यात बऱ्यापैकी यशस्वी ठरतो.

सैनिक असणाऱया हृतिक रोशन याच्यावर जबाबदारी सोपवण्यात येते. आंतरराष्ट्रीय कुख्यातीच्या दहशतवादाला पकडायचं असतं. पण अचानक तो एका पाठोपाठ एक आपल्याच अधिकाऱयांना मारायला लागतो. मग त्याला पकडून आणायची जबाबदारी त्याचा पट्टशिष्य असणाऱया टायगर श्रॉफवर दिली जाते. वैयक्तिक निष्टेपेक्षा देशप्रेम मोठं मानणारा हा शिष्य आपल्या गुरूंच्या मागावर निघतो आणि सुरू होतो एक नवा खेळ, एक युद्ध. नेमकं होतं काय? अनेक वळणांचा हा चित्तथरारक प्रवास पडद्यावर पाहताना लॉजिकच्या अपेक्षा बाळगल्या नाहीत तर करमणूक होऊ शकते.

हा सिनेमा सिद्धार्थ आनंद यांनी केलाय. अवाढव्य दृश्ये, बाईक, कार्स, विमान अशा सगळय़ांचा वापर करून रंगलेली धुमश्चक्री, हृतिक आणि टायगर यांची नेत्रदीपक ऍक्शन, खच्चून भरलेला श्रीमंती चकचकीतपणा, जगभरातील विहंगम दृश्ये, एवढेच नाही तर त्या दृश्यांमधलं वैविध्य, शिवाय अचंबित करतील अशी धक्कातंत्र हे सगळं पाहताना नक्कीच भारदस्त वाटतं. इतकं की हा सिनेमा अब्बास मस्तान यांनी तर बनवला नाहीये ना, असं वाटल्याशिवाय राहवत नाही.

सिनेमाची पटकथा दमदार असती तर ऍक्शनसोबत सिनेमाला भक्कम कथानकाची साथ लाभली असती. पण दृश्यांमधली विसंगती, अचानक एक दृश्य सुरू असताना केवळ पडद्यावर प्रभाव पाडण्यासाठी दुसरंच दृश्य समोर येणं या सगळय़ांमुळे या सिनेमाच्या कथेवर फारसा विचारच केला गेला नाहीये हे ठळकपणे लक्षात येतं.

अर्थात मुख्य अभिनेते हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ हे मात्र कमाल आहेत. दोघेही आपापल्या परीने जबरदस्त. अर्थात खिळवून ठेवणारी अगदी हॉलीवूड स्टाईल ऍक्शन दृश्ये, उत्तम नृत्य, लवचिकता आणि स्टायलिश वावर हा दोघांमधला सामाईक बिंदू या सिनेमात नेमका हेरला आहे आणि हा समन्वय सिनेमाला नक्कीच एका उंचीवर नेऊन ठेवतो. हे दोघे सिनेमाच्या प्रत्येक फ्रेममध्ये इतके व्यापले आहेत की अभिनेत्री वाणी कपूरच्या वाटय़ाला विशेष काही आलंच नाहीये.

बाकी गाणी, संकलन याबाबतीत सिनेमा चांगला बांधला गेलाय. दृश्ये सलग नसल्यामुळे आणि दिग्दर्शकाला जे वाटेल ते घुसडल्यामुळे सिनेमा बऱयाच ठिकाणी उगाच खटकतो. गाणीदेखील बरी असली तरीही हे दोन उत्तम नृत्य करतात हे जाणून अचानक घटल्यासारखी वाटतात. अजून एक म्हणजे हा सिनेमा होऊ दे खर्च पठडीतला आहे. दृश्यची गरज आहे की नाही यापेक्षा ते कसं दिसतं याचा विचार केला गेलाय. प्रचंड पैसा ओतलेला अगदी क्षणाक्षणाला जाणवतो.

पण परत एकदा सांगावसं वाटतं, बाकी काही नाही तरी या सिनेमाची ऍक्शन कमाल आहे. हृतिक आणि टायगर या कॉम्बोसह देखणी आणि अचंबित करणारी दृश्ये पाहायला मजा येते. त्यामुळे जास्त अपेक्षा न ठेवता केवळ या दोघांसाठी एकदा हा सिनेमा पाहायला काहीच हरकत नाही.

सिनेमा वॉर
दर्जा ***(1/2)
निर्माता आदित्य चोप्रा
दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद
पटकथा सिद्धार्थ आनंद, श्रीधर राघवन
संवाद अब्बास टायरवाला
संगीत विशाल शेखर
कलाकार हृतिक रोशन, टायगर श्रॉफ, वाणी कपूर, आशुतोष राणा, दीपनिता शर्मा.

 

आपली प्रतिक्रिया द्या