खासदार अमर सिंह यांचे निधन, गेल्या सहा महिन्यांपासून होते आजारी

राज्यसभेचे खासदार अमर सिंह यांचे निधन झाले आहे. गेले 6 महिने ते आजारी होते. सिंगापूरमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गेली 6 महिने सिंगापूरमधील माऊंट एलिझाबेथ रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. शेवटच्या क्षणी फक्त त्यांची पत्नी त्यांच्यासोबत होती.

90 च्या दशकात अमर सिंह उत्तर  प्रदेश शुगर लॉबीचा माणूस म्हणून प्रसिद्ध होते. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव आणि त्यांच्यात जवळीक वाढली होती. 1996 साली त्यांनी अधिकृतरित्या समाजवादी पक्षात प्रवेश केला. नंतर लवकरच त्यांना पक्षाच्या मोठ्या जवाबदारी देण्यात आली आणि त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. कोणे एके काळी अमर सिंह हे मुलायम सिंह यादव यांचे उजवे हात समजले जात.

2008 साली न्युक्लियर डीलवरून डाव्या पक्षांनी काँग्रेसचा पाठिंबा काढला. तेव्हा मनमोहन सिंह यांचे सरकार वाचवण्यात अमर सिंह यांनी महत्त्वाची भुमिका बजावली. सपा आणि अपक्ष आमदारांनी मिळून सिंह यांचे सरकार वाचवले. अनेकवेळा सिंह यांचे नावही वादात अडकले होते. संसदेत नोटा दाखवल्याप्रकरणी त्यांना जेलची हवाही खावी लागली होती.  समाजवादी पक्षात त्यांची ताकद वाढत होती. त्यामुळे पक्षातील इतर नेते आजम खान आणि बेनी प्रसाद वर्मा नाराज झाले होते. त्यांनी पक्षही सोडला होता. त्यामुळे पक्षाने मुलायम सिंह यांच्यावर कारवाई करत त्यांना 2010 साली पक्षातून निलंबीत करण्यात आले होते. नंतर 2016 साली ते पुन्हा पक्षात आले होते. अखिलेश यादव यांच्याकडे पक्षाची जवबादारी अल्यानंतर ते पक्षातून बाजूला पडले होते.

आपली प्रतिक्रिया द्या