खासदार माझ्या तोंडावर थुंकला, महिला पत्रकाराची पोलिसांत तक्रार

29

सामना ऑनलाईन, कटक

ओडिशातील एका महिला पत्रकाराने बिजू जनता दलाच्या खासदाराविरोधात पोलिसांत तक्रार केली आहे. आपल्याशी या खासदाराने गैरवर्तन केल्याची तक्रार पत्रकाराने केली आहे. अनुभव मोहंती असं या खासदाराचे नाव असून ते ओडिया चित्रपटातील अभिनेतेही आहेत. ही महिला पत्रकार मोहंती यांच्या घरी गेली होती. अनुभव यांचा भाऊ अनुप्राश यांनी या महिलेशी गैरवर्तन केलं होतं असा तिचा आरोप आहे, ज्याची तक्रार करण्यासाठी ही महिला अनुभव यांच्या घरी गेली होती.

अनुप्राश मोहंती हा सातत्याने आपल्याला त्रास देत असल्याचं या महिलेने म्हटले आहे. 12 तारखेला अनुप्राश आणि त्याच्या मित्रांनी या महिलेचा रस्ता रोखला आणि तिच्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. हा त्रास सहन न झाल्याने अनुप्राश यांची तक्रार त्याच्या मोठ्या भावाकडे म्हणजेच अनुभव यांच्याकडे करण्याचं महिलेने ठरवलं. ही महिला जेव्हा अनुभव यांच्या घरी गेली तेव्हा त्यांनी तिला शिवीगाळ करत फासावर लटकावण्याची धमकी दिली. मोहंती यांनी यानंतर पोलिसांना बोलावले. ही महिला पोलिसांच्या गाडीत बसून जात असताना मोहंती माझ्या तोंडावर थुंकले असा आरोप या महिलेने केला आहे.

पोलिसांनी या महिलेची तक्रार लिहून घेतली आहे. या आरोपांबाबत मोहंती यांना विचारलं असता ते म्हणाले की हे आरोप खोटे आहेत. आपली बदनामी करण्यासाठी या महिलेने खोटी तक्रार केल्याचं अनुभव यांनी सांगितले आहे. ही महिला घराबाहेर तमाशा करत असल्याने आपण पोलिसांना बोलावल्याचं ते म्हणाले

आपली प्रतिक्रिया द्या