संतप्त शिवसैनिकांनी धैर्यशील मानेंचा ताफा अडवला, गद्दारीवरून विचारला जाब

dhairyashil-mane-car-block

 

शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करत शिंदे गट बाहेर पडल्यापासून शिवसैनिक या गटावर कमालीचा नाराज आहे. याचाच प्रत्यय आज पुन्हा एकदा आला आहे. हातकणंगले मतदारसंघाचे शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने हे आज चंदूर येथे कार्यक्रमानिमित्त जात असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या शिवसैनिकांनी त्यांचा ताफा अडवला. पक्षाशी गद्दारी का केली? असा सवाल शिवसैनिकांनी त्यांना विचारला.

बुधवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कार्यकर्ते आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आले. गद्दारीमुळे संतापलेल्या शिवसैनिकांनी खासदारांना जाब विचारल्यानं वातावरण तापलं. दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची देखील झाली. परिस्थिती चिघळून नये यासाठी पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला. त्यांनी कार्यकर्त्यांना बाजूला करत खासदार धैर्यशील माने यांची गाडी पुढे काढली.

शिवसैनिकांशी आणि ज्यांनी त्यांना निवडणुकीचे तिकीट दिले त्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करत धैर्यशील माने शिंदे गटात गेले. यामुळे शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाले असून प्रत्येक गावामध्ये त्यांना अडवून जाब विचारण्यासाठी ते आता सज्ज झाले आहेत आणि संपूर्ण जिल्ह्यात अशा पद्धतीनेच सर्व गद्दारांना जाब विचारण्यात येईल, असे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी सांगितले आहे.