मोदी, योगी समाजासाठी कलंक, भाजप मंत्र्यांचा खळबळजनक व्हिडीओ व्हायरल

8116

उत्तर प्रदेशचा कुख्यात आरोपी विकास दुबे याच्या एन्काऊंटरप्रकरणी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना भाजप मंत्र्यांनी केलेल्या विधानामुळे खळबळ उडाली आहे. भाजप नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ समाजासाठी कलंक असल्याचे विधान केले. त्यांचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असून काँग्रेस नेते शेअर करताना दिसत आहेत.

शिवराज सरकारमधील नवनिर्वाचित मंत्री आणि सिंधिया समर्थक तुलसी सिलावट यांना विकास दुबे याच्या एन्काऊंटरप्रकरणी प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी ही घटना समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे म्हटले. मात्र यानंतर त्यांनी पंतप्रधान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांना समाजासाठी कलंक असल्याचे विधान केले.

शिवराज यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी हे विधान केल्याने सोशल मीडियावर याचा व्हिडीओ व्हायरल झाला. काँग्रेसने हा व्हिडीओ शेअर करत ‘अखेर सत्य ओठांवर आले’, असे म्हणत भाजपची फिरकी घेतली.

वाद वाढत असल्याचे दिसताच तुलसी सिलावट यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आणि व्हिडीओसोबत छेडछाड झाल्याचे सांगितले. पंतप्रधान आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांचे मी अभिनंदन केले. विकास दुबे समाजासाठी कलंक असल्याचे मी म्हटले. मात्र काँग्रेसने या व्हिडीओसोबत छेडछाड केली असल्याचा आरोप तुलसी यांनी केला. या प्रकरणी आपण कायदेशीर कारवाई करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दुबे’जी
एकीकडे हा व्हिडिओ व्हायरल होत असताना इंदूरमध्ये भाजप खासदार शंकर ललवाणी यांनी गुंड विकास दुबे याला ‘जी’ लावत त्याला मान दिला. या नंतर त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, मात्र व्हिडीओ व्हायरल झाल्यावर त्यांच्यावर विरोधकांनी निशाणा साधला.

आपली प्रतिक्रिया द्या