संजय राऊत तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है; क्रांतीचौकात शिवसेनेचे जोरदार धरणे आंदोलन

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना ईडीच्या पथकाने अटक केली. सूडबुद्धीने केलेल्या या अटकेच्या कारवाईमुळे संभाजीनगर जिल्ह्यासह राज्यभरात संतापाची लाट उसळली असून सोमवारी ईडीने केलेल्या कारवाईच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने क्रांतीचौकात जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात शिवसैनिकांमध्ये प्रचंड संताप दिसून आला. भाजपा शिवसेना से डरती है, ईडी को आगे करती है, संजय राऊत तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है, शिवसेना अंगार है, बाकी सब भंगार है, ईडीचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय, ईडीचा गैरवापर करणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो’ भाजप सरकार हाय हाय च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

या आंदोलनप्रसंगी विभागीय सचिव अशोक पटवर्धन, माजी महापौर नंदकुमार घोडेले, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर, कृष्णा डोणगावकर, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, ज्ञानेश्वर डांगे, विधानसभा संघटक राजू वैद्य, गोपाल कुलकर्णी महिला आघाडी जिल्हा संघटक प्रतिभा जगताप युवा सेनेचे उपसचिव ऋषिकेश खैरे, मच्छिंद्र देवकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी ‘उद्धव ठाकरे आप आगे बढो हम तुम्हारे साथ है’, ‘संजय राऊत आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है’, ‘ईडीचा गैरवापर करणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो’, ‘ईडीचा करायचं काय खाली मुंडकं वर पाय’, ‘मोदी सरकार हाय हाय’ ‘भाजप शिवसेना से डरती है, ईडी को आगे करती है’ ‘शिवसेना अंगार है बाकी सब भंगार है’, ‘हा आवाज कुणाचा शिवसेनेचा’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसेना संपविण्यासाठी भाजपचे कारस्थान – खैरे
शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने अटकेची कारवाई केली याचा आम्ही निषेध करतो. शिवसेना संपवण्यासाठी केंद्रातील भाजप सरकार जाणीवपूर्वक अशा प्रकारचे राजकारण करत आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करू. संघर्ष करत करत शिवसेना पुढे घेऊन जाऊ असे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले.

शिवसेनेचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न – दानवे
भारतीय जनता पार्टीच्या इशाऱ्यावर केंद्रीय सरकारी यंत्रणा काम करत असून या केंद्रीय सरकारी यंत्रणा सूडबुद्धीने अधिकाराचा गैरवापर करून शिवसेनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. हे संपूर्ण जनता पहातच आहे. महाराष्ट्रातील जनतेचा मराठी माणसाचा स्वाभिमान वारंवार दुखावण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी आजचे आम्ही हे आंदोलन केले असल्याचे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी सांगितले.