
ठाणे शहराच्या पाचपाखाडी परिसरात असलेले सुप्रसिद्ध अशा ‘प्रशांत कॉर्नर’ या मिठाईच्या दुकानावर गुरुवारी दुपारच्या सुमारास तोड कारवाई करण्यात आली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी ‘प्रशांत कॉर्नर’ या दुकानात खरेदीसाठी आल्या होत्या. यावेळी दुकानाबाहेर त्यांचे वाहन उभे करण्यावरुन वाद झाला. तसेच दुकानात टोकन न घेताच त्या खरेदी करत होत्या. त्यावरूनच त्यांच्या कर्मचाऱ्यांसोबत वाद झाला. त्यानंतर त्या खरेदी न करताच रागाने दुकानाबाहेर निघून गेल्या. या घटनेनंतरच प्रशांत कॉर्नरवर तोड कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी धर्मराज्य पक्षाने केली आहे. तसेच श्रीकांत शिंदे यांच्या पत्नीला राग आल्याने प्रशांत कॉर्नरवर कारवाई करण्यात आली का, असा सवालही पक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे.
याबाबतचे पत्र धर्मराज्य पक्षाचे ठाणे शहर संघटक अजय जया यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ठाणे पोलीस आयुक्त जयजित सिंग आणि ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना पाठवले आहे. त्यात त्यांनी या घटनेबाबतची माहिती दिली आहे. तसेच या कारवाईबाबत सवाल उपस्थित करत याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी पत्रात म्हटले आहे की,
विषय : ठाण्याच्या पाचपाखाडी परिसरातील, ‘प्रशांत कॉर्नर’ या मिठाईच्या दुकानावरील, तथाकथित कारवाईसंदर्भात, सखोल चौकशी करण्यात येणेबाबत…
महोदय,
उपरोक्त विषयांन्वये आम्ही ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने आपल्या निदर्शनास आणून देत आहोत की, ठाणे शहराच्या पाचपाखाडी परिसरात असलेले, सुप्रसिद्ध अशा ‘प्रशांत कॉर्नर’ या मिठाईच्या दुकानावर गुरुवार, दि. २५/०५/२०२३ रोजी, दुपारच्या सुमारास तोडक कारवाई करण्यात आली. या कारवाईमागील आम्हाला आमच्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी, ‘प्रशांत कॉर्नर’ या दुकानात खरेदीसाठी आल्या होत्या. यावेळी दुकानाबाहेर त्यांचे वाहन उभे करण्यावरुन, कर्तव्यावर उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षकाने, वाहतुकीला तसेच, इतर ग्राहकांना व त्यांच्या वाहनांना अडथळा निर्माण होऊ नये म्हणून, सौ. शिंदे यांच्या वाहनचालकाला वाहन योग्य त्या ठिकाणी उभे करण्यास सांगितले. यावरुन वाद निर्माण झाल्यानंतर, खा. श्री. श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी खरेदीसाठी दुकानात निघून गेल्या. सदर ‘प्रशांत कॉर्नर’ या दुकानात सुरुवातीला टोकन घेऊनच मिठाई किंवा तत्सम जिन्नस खरेदी करण्याची पद्धत असताना, सौ. शिंदे यांनी दुकानातील संबंधित कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला आणि खरेदी न करताच त्या, रागारागाने तडक दुकानाबाहेर निघून गेल्या.
दरम्यान, उपरोक्त घटना घडल्यानंतर, अवघ्या अर्ध्या तासात ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाचे कर्मचारी तिथे पोहोचले आणि त्यांनी थेट, ‘प्रशांत कॉर्नर’ दुकानाच्या बाहेरील निवारा शेड व इतर बांधकाम उध्वस्त केले. वास्तविक पाहाता, तोडून टाकलेले बांधकाम आणि उन्हा-पावसातून संरक्षण मिळावे यासाठी उभारलेली निवारा शेड, दुकानाच्या जागेतच असताना, ‘प्रशांत कॉर्नर’वर झालेली तथाकथित कारवाई ही, सूडबुद्धीने करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी सुस्पष्ट होत आहे. खा. श्री. श्रीकांत शिंदे यांच्या पत्नीला कोणतीही अपमानास्पद वागणूक मिळालेली नसताना आणि केवळ वाहन उभे करण्यावरुन झालेल्या वादाचे पर्यवसान जर, अशपद्धतीने सुड उगावून होणार असेल तर, ठाणे शहरात नक्कीच ‘मोगलाई’ अवतरली आहे की काय? असा प्रश्न आता सर्वसामान्य ठाणेकर जनतेला पडल्यावाचून राहणार नाही. ‘प्रशांत कॉर्नर’वर झालेली कारवाई ही, नक्कीच राजकीय दबावापोटी झालेली आहे. अशाप्रकारची दडपशाही-दंडेलशाही ‘धर्मराज्य पक्ष’ कदापि खपवून घेणार नाही. या बेबंदशाहीमुळे ‘प्रशांत कॉर्नर’च्या संबंधित सुरक्षारक्षक आणि इतर कामगारांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने, याप्रकरणी आपण कठोर पाऊले उचलावीत आणि घटनेची सत्यता पडताळण्यासाठी, ‘प्रशांत कॉर्नर’ या दुकानाबाहेरील व आतील भागातील सीसीटिव्ही चित्रीकरण त्वरित तपासून, ते तपासकामी सुरक्षित ठेवावे आणि योग्य ती सखोल चौकशी करुन, कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा या राजकीय गुंडगिरीविरोधात ‘प्रशांत कॉर्नर’या दुकानाबाहेर, ‘धर्मराज्य पक्ष’ तीव्र निषेध आंदोलन करेल, याची आपण गांभीर्याने नोंद घ्यावी.
कळावे, सहकार्याच्या अपेक्षेसहित, धन्यवाद!
आपला विश्वासू,
श्री. अजय जया.
संघटक : ठाणे शहर, धर्मराज्य पक्ष.