कोश्यारी आणि त्रिवेदीची बुद्धी भ्रष्ट झाली काय? अशी वक्तव्य करताना यांना लाज वाटत नाही, उदयनराजे संतापले

ज्यावेळेस देशभरातील सर्व राजे मुघलांसमोर शरण गेले त्यावेळेस शिवाजी महाराज हे मुघलांना विरोध करत त्यांच्या विरोधात लढले. त्यांनी मुघलांसोबत केलेला संघर्ष स्वतःसाठी नाही तर सर्वसामान्य लोकांसाठी केला. हिंदुस्थानात नेताजी सुभाषचंद्र बोस, क्रांतीसिंह नाना पाटील, भगत सिंग व लोकमान्य टिळक अशा सर्व महापुरुषांचे आदर्श शिवाजी महाराज होते. तर सामाजिक क्षेत्रात क्रांती करणारे बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज यांनी देखील शिवाजी महाराजांना आपले स्फूर्तिस्थान मानले. शिवाजी महाराजांनी सर्वसामान्यांना गुलामगिरीतून मुक्त करण्याकरिता लढाई केली आणि राज्यपाल म्हणतात शिवाजी महाराजांचा इतिहास जुना झाला? आधुनिक भारताची संकल्पना त्यावेळी शिवाजी महाराजांनी मांडली होती. अनेकांचं स्फूर्तिस्थान शिवाजी महाराज होतं त्यांना शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरणा मिळाली. मग या कोश्यारी आणि सुधांशु त्रिवेदीची बुद्धी भ्रष्ट झाली काय? अशी वक्तव्य करताना यांना लाज वाटत नाही. अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी आपला संताप व्यक्त केला.

राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी ते म्हणाले की शिवाजी महाराज हे आयुष्यभर ताठ मानेने जगले. स्वराज्याची संकल्पना आणि सर्वधर्म समभाव हा विचार त्यावेळी शिवाजी महाराजांनी मंडला होता. महिला, लहान मुलं या सर्वांचा त्यांनी सन्मान केला. आज हिंदुस्थान ही जगात सर्वात मोठी लोकशाही आहे. या देशातील लोकांना एकत्रित ठेवायचं असेल तर शिवाजीमहाराजांची विचारधारा सोडून चालणार नाही.

पूर्वीचा काळ हा चांगला होता. त्यावेळी समाजाचा विचार व्हायचा. मात्र आत फक्त स्वतःचा विचार होत आहे. शिवाजी महाराजांनी लोकशाहीची संकल्पना मांडली, कायम सर्वसामान्यांचा विचार केला. त्यांनी स्वतःचं राज्य नाही तर हे रयतेचं राज्य आहे असं म्हटलं. सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून शिवाजी महाराजांनी राज्यकारभार केला. त्या शिवाजी महाराजांचा आज अपमान होत आहे. हल्ली मी मी आणि मी हा विचार केला ज़ातो. मात्र शिवाजी महाराज असा विचार करत नव्हते. शिवाजी महाराजांचे विचार आपण आचरणात आणणार आहोत की नाही. देवाच्या रूपाने एखादा युगपुरुष जन्माला येतो. या शिवाजी महाराजांची आज अवहेलना केली जाते. शिवाजी महाराज नसते तर आपण सर्व गुलामगिरीत असतो. दुसऱ्या देशात महापुरुषांचा अपमान झाला तर लोक पेटून उठतात. असे ते म्हणाले.

मी माझं भाग्य समजतो. मागच्या जन्मात माझ्याकडून काही पुण्य झालं असेल म्हणून मी या घराण्यात जन्माला आलो. राज्यपाल तसेच सुधांशु त्रिवेदी यांनी केलेल्या वक्तव्याचा सामान्य लोकांना राग आला आहे. मी कोश्यारींचा विरोधात नाही तर त्या प्रवृत्तीचा विरोधात आहे. अशी प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे. ज्यावेळी कोश्यारींकडून शिवरायांचा अपमान झाला तेव्हा शरद पवार व नितीन गडकरी व्यासपीठावर होते. मात्र त्यांनी त्यावेळी कोश्यारींच्या भाषणाचा निषेध का केला नाही? यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा कोणी अवमान केला तर त्याला नेस्तनाबूत करण्याचा निर्धार आम्ही केला आहे. विकृती ही विकृती असते विकृतीला पक्ष, जात-पात काही नसतं. विकृती छाटून फेकून दिली पाहिजे. सगळ्या पक्षांनी भूमिका स्पष्ट करावी. कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी या दोघांची हकालपट्टी झाली पाहिजे. तसेच नरेंद्र मोदींनी देखील याचा विचार केला पाहिजे. असे मत त्यांनी व्यक्त केले.