चिपी विमानतळ लवकरच सुरू होणार, खासदार विनायक राऊत यांनी घेतली केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांची भेट

सिंधुदुर्ग चिपी विमानतळाची नागरी हवाई वाहतूक संचलनालय (डिजीसीए) कडून पाहणी होऊन लवकरात लवकर हे विमानतळ सुरु करण्यासाठी आवश्यक परवानगी मिळावी अशी विनंती रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांनी नागरी हवाई वाहतुक मंत्री ज्योतीरादित्य सिंदिया यांची दिल्ली येथे भेट घेऊन केली आहे. याबाबत सिंदिया यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे त्यामुळे चिपी विमानतळावरुन लवकरच विमानसेवा सुरु होईल असा विश्वास खासदार राऊत यांनी व्यक्त केला आहे.

खासदार विनायक राऊत यांनी चिपी विमानतळाच्या कामाची 9 जुलै रोजी पाहणी करुन संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेतला होता. त्यानंतर असे निदर्शनास आले की, विमानतळ सुरु करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कामे पुर्ण असून त्यात कोणत्याही त्रुटी शिल्लक राहिलेल्या नाहीत. तसेच 28 जून 2021 रोजी आयआरबी कंपनीने नागरी हवाई वाहतूक संचलनालयाला त्या संदर्भातील अॅक्शन टेकन रिपोर्ट सबमिट करुन 4C VFR ऐरोड्रोम लायसन्स मिळण्यासाठी विनंती केलेली आहे.

त्यामुळे विमानतळ संपूर्णपणे पूर्ण झाल्याची खात्री झाल्यानंतर तो सुरु करण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानगीला चालना देण्यासाठी खासदार राऊत यांनी नुकतीच दिल्ली येथे नागरी हवाई वाहतुक मंत्री सिंदिया यांची भेट घेऊन त्यांना चिपी विमानतळाची नागरी हवाई वाहतूक संचलनालयाची पहाणी होऊन लवकरात लवकर हे सुरु करण्यासाठी आवश्यक परवानगी मिळावी अशी विनंती केली आहे.

यावेळी केंद्रिय नागरी हवाई वाहतूक मंत्री सिंदिया यांनी याबाबत आपण विशेष लक्ष घालून 8 ते 10 दिवसांत आपणांस रिझल्ट देतो असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे चिपी विमानतळावरुन लवकरच विमानसेवा सुरु होईल असा विश्वास खासदार राऊत यांनी व्यक्त केला आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या