Budget 2022 अर्थसंकल्प सादर करत असताना काय पीत होता ? उत्सुक खासदारांनी विचारला अर्थमंत्र्यांना प्रश्न

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी १ फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकारच्या काळातील 10 वा आणि वैयक्तिकरित्या सीतारमण यांचा अर्थमंत्री म्हणून हा चौथा अर्थसंकल्प होता. अर्थसंकल्पाचे वाचन करत असताना त्यांच्या टेबलवर दोन ग्लास ठेवण्यात आले होते. या ग्लासात काय होतं याची काही खासदारांना फार उत्सुकता होती. निर्मला सीतारमण यांनी 90 मिनिटे अर्थसंकल्पाचे वाचन केले, हे वाचन करत असताना त्या सातत्याने या ग्लासमधील द्रव्य पिताना दिसत होत्या. यामुळे या ग्लासात काय होतं, याबाबतची खासदारांची उत्सुकता चाळवली गेली होती.

इंडीयन एक्सप्रेसच्या ‘दिल्ली कॉन्फिडेन्शिअल’ या स्तंभामध्ये याबाबतचा किस्सा छापण्यात आला आहे. अर्थसंकल्पाचे वाचन संपवल्यानंतर निर्मला सीतारमण लॉबीतून जात होत्या तेव्हा त्यांना काही खासदारांनी थांबवलं होतं. हे खासदार दक्षिणेकडील राज्यातील होते. यावेळी बोलत असताना त्यांनी निर्मला सीतारमण यांना प्रश्न विचारला की तुम्ही ग्लासातून काय पीत होता? यावर निर्मला सीतारमण यांनी उत्तर दिले की एका ग्लासामध्ये इलेक्ट्रॉल होतं आणि दुसऱ्या ग्लासामध्ये नारळपाणी होती. हे दोन्ही ग्लास अर्थसंकल्प वाचत असताना निर्मला सीतारमण यांनी संपवले होते.

डिजिटल बजेटचा गाजावाजा, मध्यमवर्गीयांच्या हाती बाबाजीका ठुल्लू

कोरोनामुळे घराघरात पोहोचलेले आर्थिक संकट, वाढलेली बेरोजगारी, महागाई यामुळे मेटाकुटीला आलेल्या जनतेला केंद्रीय अर्थसंकल्पात काहीसा दिलासा मिळेल, अशी आशा होती. मात्र, ही आशा पार धुळीस मिळाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मांडलेले 2022-23चे बजेट म्हणजे केवळ ‘स्वप्नात रंगले मी, स्वप्नात दंगले मी’ असेच स्वप्नरंजन आहे. आयकर रचना जैसे थे ठेवल्यामुळे करदात्यांची घोर निराशा झाली. मध्यमवर्गीयांच्या हातात तर बाबाजी का टूल्लू मिळाला आहे. अन्नदाता शेतकऱयांसाठी हे बजेट निरुपयोगी ठरले असून, केवळ डिजिटल इंडियाचा गाजावाजा आणि पुढील 25 वर्षांची ब्ल्यू प्रिंटचा डंका यात करण्यात आला आहे. दरम्यान, या अर्थसंकल्पानंतर पेट्रोल-डिझेलसह इतर वस्तूंच्या महागाईचा भडका कायम राहणार आहे.

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सादर होणारा 2022-23चा अर्थसंकल्प अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण होता. कोरोनामुळे पोखरलेल्या अर्थव्यवस्थेला ‘बूस्टर डोस’ मिळणार का? याकडे देशाचे लक्ष लागले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी सराकरचे 10 वे आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे हे चौथे बजेट होते. गेल्यावर्षीप्रमाणे अर्थमंत्री सीतारामन यांनी यावेळीही पेपरलेस बजेट सादर केले. डिजिटल पॅडच्या आधारे अर्थमंत्र्यांनी दीड तास भाषण केले. देशाच्या स्वातंत्र्याचे हे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. ‘आझादी का अमृतमहोत्सव’ असून, आपण आता अमृतकाळात प्रवेश केला आहे. पुढील 25 वर्षांचा विचार करून अर्थसंकल्प तयार केला आहे. 25 वर्षांची ही ब्ल्यू प्रिंट आहे म्हणजे स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षात देश कसा असावा याचे चित्र अर्थसंकल्पात असल्याचे अर्थमंत्री सीतारामन यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला स्पष्ट केले. त्यानंतर डिजिटल इंडिया, ब्ल्यू प्रिंट, पीपीपी मॉडेल, आत्मनिर्भर भारत असा वारंवार उल्लेख केला. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला फटका बसल्याचे स्पष्ट करताना अर्थमंत्र्यांनी चालू आर्थिक वर्षांत वित्तीय तूट तब्बल 6.9 टक्के आणि आगामी आर्थिक वर्षांत 2022-23 मध्ये ही तूट जीडीपीच्या 6.4 टक्के राहील, असे सांगितले. चालू आर्थिक वर्षांत विकासदर 9.2 टक्के राहील अशी आशा व्यक्त केली. देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी भारतीय आर्युमान कंपनीचे (एलआयसी) आयपीओ यावर्षी निघणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून डिजिटल चलन बाजारात येईल आणि क्रिप्टो करन्सीच्या उत्पन्नावर 30 टक्के कर आकारणी अशा काही घोषणा अर्थमंत्र्यांनी यावेळी केल्या.