‘चि.सौ.कां.’ मृण्मयी शिकली कुंग फू

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलीवूड मधील अनेक दिग्गज कलाकार हे चित्रपटासाठी मार्शल आर्ट्सचं प्रशिक्षण घेतात हे सगळ्यांना माहितीच आहे. चित्रपटासाठी गरज असेल तर अशा प्रकारचं प्रशिक्षण घेण्यात मराठी कलाकार देखील मागे नाहीत. तुम्हाला आश्चर्य वाटेल की आगामी चित्रपटासाठी अभिनेत्री मृण्मयी गोडबोलेने चक्क ‘कुंग-फू’चे धडे घेतले आहेत. ‘चि. व चि. सौ. कां.’ या चित्रपटासाठी मृण्मयीने कुंग फूचं प्रशिक्षण घेतलं. ‘चि. व चि. सौ. कां.’ या चित्रपटातून प्रेक्षक मृण्मयीला मोठ्या पडद्यावर कुंग फू करताना पाहू शकतील.

मृण्मयी तिच्या कुंग फू प्रशिक्षणाबद्दल सांगते, “मी या आधी कलरीपयट्टू शिकले आहे आणि १० वर्षं मी बास्केटबॉल सुद्धा खेळले आहे. पण मी या आधी ‘कुंग फू’ कधीच शिकले नव्हते. चित्रपटाच्या शूटिंगच्या १ महिना आधी मला आणि ललितला ‘कुंग फू’चं प्रशिक्षण देण्यात आलं. मी चित्रपटात कुंग फूमध्ये ब्लू बेल्ट असलेल्या मुलीचं पात्र साकारलंय. जरी मी ट्रेनिंग सेशन्स उशिरा सुरू केले तरी मी खूप मेहनत आणि प्रॅक्टिस करून कुंग फू शिकले आणि त्यात मला माझ्या कलरीपयट्टू आणि बास्केटबॉल ट्रेनिंगची खूप मदत झाली. आमचे ट्रेनर श्रीकांत सर यांनी खूप कठीण ट्रेनिंग देऊन आमच्याकडून व्यायाम व स्ट्रेचिंग करून घेतले. मला असं वाटतंय मी एका महिन्यात वर्षभराचं कुंग फू शिकलेय.”

पुढे मृण्मयी म्हणाली, “कुंग फू शिकण्याची प्रक्रिया खूप कडक आणि थकवणारी होती, पण त्याची चित्रपटाच्या शूटिंगमध्ये आम्हाला खूप मदत झाली. मला आणि ललितला दुखापत ही झाली आणि आम्ही एकमेकांना मारलं देखील, पण ते जाणीवपूर्वक नव्हतं, तो चित्रीकरणाचा भाग होता.”

आपली प्रतिक्रिया द्या