धोनीने आता ‘वन डे’ ऐवजी ‘टी-20’ सामने खेळावे, प्रशिक्षकांचे स्पष्ट मत

83

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाचे आव्हान सेमी फायनलमध्ये संपुष्टात आल्यानंतर महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा रंगू लागल्या. याच दरम्यान धोनीचे लहाणपणीचे प्रशिक्षक केशव बॅनर्जी यांनी मात्र त्याच्यामध्ये अद्याप बरेच क्रिकेट बाकी असून आगामी टी-20 वर्ल्डकप त्याने नक्की खेळावा अशी प्रतिक्रिया दिली आहे.

‘धोनीने टी-20 क्रिकेट खेळायला हवे. 50 षटकांच्या सामन्यात यष्टीरक्षक केल्यानंतर पुन्हा फलंदाजी करणे कठीण असते. तसेच गोलंदाजांना आणि क्षेत्ररक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी तो नेहमीत आघाडीवर असतो. परंतु टी-20 मध्ये त्याला एवढी उर्जा खर्च करावी लागणार नाही. धोनीचा सध्याचा फिटनेस पाहता तो क्रिकेटच्या छोट्या स्वरुपासाठी फिट असून आगामी वर्ल्डकपमध्ये तो नक्की खेळताना दिसेल’, असे केशव बॅनर्जी म्हणाले.

वर्ल्डकपमधील खराब प्रदर्शनामुळे धोनीवर दबाव वाढत आहे. धोनी आणि बीसीसीआयने अद्याप त्याच्या निवृत्तीबाबत अधिकृत वक्तव्य केले नाही. परंतु याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. कारण वर्ल्डकपमध्ये धोनीने 8 लढतीत फक्त 273 धावा केल्या. तसेच यष्टीरक्षण करताना त्याच्याकडून अनेक चुकाही होत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे. अनेकांनी तो ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी-20 वर्ल्डकपनंतर निवृत्ती घेईल असाही अंदाज व्यक्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या