महेंद्रसिंग धोनी आता गोल्फच्या मैदानात!

873

टिम इंडियाचा माजी कर्णधार आणि फिनिशर अशी ओळख असलेला महेंद्रसिंग धोनी क्रिकेट विश्वचषक सामन्यांनंतर क्रिकेटच्या मैदानात उतरलेला नाही. त्यामुळे अनेकदा त्याच्या निवृत्तीबाबतच्या चर्चा होत असतात. त्याचबरोबर तो संघात पुनरागमन करण्याच्या चर्चाही सुरू आहेत. मात्र, महेंद्रसिंग धोनी क्रिकेटच्या मैदानाऐवजी गोल्फच्या मैदानात उतरलेला दिसला. क्रिकेटपटू केदार जाधव आणि संघातील माजी खेळाडू आर.पी. सिंह यांच्यासोबत धोनीने गोल्फचा आनंद लुटला. याचे फोटो केदार जाधवने सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

खेळण्याचा आनंद घेण्यासोबत मित्रांसोबत दिवस मजेत गेला अशी प्रतिक्रिया आर.पी सिंहने हा फोटो रिट्विट करताना दिली. याआधी धोनी रांचीतील स्टेडियममध्ये नेट प्रॅक्टिस करताना दिसला होता. त्यानंतर त्याच्या क्रिकेटमध्ये पुनरागमनाच्या चर्चा सुरू होत्या.धोनी आगामी क्रिकेट सामन्यांची तयारी करत असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले होते. विश्वचषक सामन्यानंतर धोनी क्रिकेटपासून दूर झाला आहे. या कालावधीत तो लष्करातही दाखल झाला होता. त्याचबरोबर टेनिस टुर्नामेंटमध्येही तो सहभागी झाला होता. मात्र, क्रिकेटमधून निवृत्त होण्याबाबत त्याने कोणतीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे धोनी नक्कीच क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल अशी आशा त्याच्या चाहत्यांना आहे.

आपली प्रतिक्रिया द्या