खेड बीएसएनएल कार्यालयाचा वीजपुरवठा पुन्हा खंडित; 4 लाखांचं बिल थकवल्याने महावितरणची कारवाई

57

सामना प्रतिनिधी, खेड

शहरातील भारत दूरसंचार निगमच्या कार्यालयाने दोन महिन्यांचे 4 लाख 83 हजार रूपयांचे थकीत वीजबिल न भरल्याने महावितरणने गुरूवारी वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली. वीजपुरवठा तोडल्याने शहरासह तालुक्यातील दूरध्वनी सेवा ठप्प झाली आहे. विजेअभावी सेवा बंद असल्याचा फलक कार्यालयाबाहेर लावला असून कार्यालयातही शुकशुकाटच आहे. वीज बिल न भरल्यामुळे या आधीही महावितरणच्या कारवाईची नामुष्की बीएसएनएल आलेली आहे.

सध्या मोबाईल सेवेचा जमाना असला तरी बीएसएनएल सेवेला तोड नाही. शहरी आणि ग्रामीण भागात आजही अनेक ग्राहक बीएसएनएलची सेवा पसंत करतात मात्र गेले काही महिने खेड बीएसएनएल कार्यालयाच्या सेवेचे पुरते तीन तेरा वाजले आहेत. महावितरणचे लाखो रुपयांचे वीज बिल थकवल्याने बीएसएनएल ची सेवा वारंवार खंडित होत आहे. यावर पर्याय म्हणून बीएसएनएल अधिकाऱ्यांनी जनरेटर वापरून ग्राहकांना सेवा देण्याचा प्रयत्न केला मात्र तो प्रयत्नही त्यांच्याच अंगलट आला. जनरेटरवरचा लोड वाढल्याने जनरेटर जाळून गेला.

बीएसएनएल कार्यालयाचे वीजबिल मुख्य कार्यालयाकडून ऑनलाईन भरले जाते. मात्र गेल्या दोन महिन्यांपासूनचे वीजबिल बीएसएनएलच्या मुख्य कार्यालयाने अद्याप भरलेले नाही. महावितरण कार्यालयाकडून सातत्याने नोटीसादेखील बजावण्यात आल्या. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने सरतेशेवटी महावितरणला वीजपुरवठा खंडित करावा लागला.

दूरध्वनी कार्यालयातील वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने बीएसएनएल सेवा पुरती कोलमडली आहे. नेहमी ग्राहकांनी गजबजलेल्या बीएसएनएल कार्यलयात ग्राहकांनी पाठ फिरवल्याने कार्यालय ओस पडले आहे. बीएसएनएलच्या खंडित झालेल्या दूरध्वनी सेवेचा शासकीय कार्यालयांसह बँकांना सर्वाधिक फटका बसत आहे. मोबाईलसेवाही कोलमडली असून ग्राहक हवालदील झाले आहेत. ग्रामीण भागातील बीएसएनएलचे टॉवरदेखील बंदावस्थेत असल्याने ग्राहक हैराण झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या