राज्यातील ११ लाख घरांमध्ये आजही अंधार

सामना ऑनलाईन । मुंबई

राज्यातील तब्बल ११ लाख ६० हजार घरांमध्ये आजही अंधारच असल्याचे समोर आले आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अनेकांना वीज कनेक्शन घेता आले नाही तर काही ठिकाणी अद्याप वीजच पोहोचू शकलेली नाही. त्यामुळे त्यांना अंधारातच दिवस काढावे लागत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ज्या घरात वीज पोहोचलेली नाही त्यांना केंद्र सरकारच्या ‘सौभाग्य’ योजनेंतर्गत डिसेंबरअखेर वीजपुरवठा करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.

मुंबई वगळता राज्यभर महावितरण वीजपुरवठा करीत असून त्यांचे दोन कोटी ४० लाखांहून अधिक ग्राहक आहेत. यामध्ये पावणेदोन कोटींहून अधिक घरगुती ग्राहक आहेत. स्वतःची वीज वितरण यंत्रणा उभारून महावितरणने त्यांना कनेक्शन दिली आहेत. तरीही ११ लाखांहून अधिक घरात वीज नाही. त्यामुळे वर्षअखेरपर्यंत त्यांना वीज देण्यासाठी महावितरणने कंबर कसली असून ७ लाख ६७ हजार घरांत थेट कनेक्शन देण्यात येणार असून २१ हजार घरांत अपारंपरिक ऊर्जा म्हणजे सौरऊर्जेच्या माध्यमातून वीज उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर उर्वरित सुमारे चार लाख दारिद्रय़रेषेखालील घरांना ‘पंडित दीनदयाल ग्राम ज्योती’अंतर्गत कनेक्शन देण्यात येणार आहे. दरम्यान, सौभाग्य योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोफत कनेक्शन देण्यात येणार असून इतर ग्राहकांना केवळ पाचशे रुपये भरावे लागणार आहेत.

‘सौभाग्य’ योजनेंतर्गत पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांच्या घरात अंतर्गत वायरिंगसह एक चार्जिंग पॉइंट, एक एलईडी दिवा मोफत देण्यात येणार आहे तर ज्या घरांना सौरऊर्जा संचामार्फत वीजपुरवठा देण्यात येणार आहे त्यांना अंतर्गत वायरिंगसह एक डीसी पंखा, पाच एलईडी दिवे आणि एक डीसी चार्जिंग पॉइंट मोफत देण्यात येणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.