म.रे. आणि प.रे.

49397
  • गुरुनाथ वसंत मराठे

मध्य रेल्वेच्या मागे कधी ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे, कधी सिग्नल यंत्रणा नादुरुस्त झाल्यामुळे तर रुळाला तडे गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत होण्याचे शुक्लकाष्ठ कायम मागे लागलेले असते. त्या तुलनेत पश्चिम रेल्वेवर मात्र अशा घटना फार क्वचितच घडतात. अर्थात पश्चिम रेल्वेचे सर्व काही आलबेल आहे अशातला भाग नाही.

सध्या पश्चिम रेल्वेचे गाडय़ा वेळेवर धावण्याचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडून गेले आहे. उदा. सकाळी 7 वा. 33 मिनिटांनी बोरिवली फलाट क्रमांक 8 वरून चर्चगेटकरिता सुटणारी धिमी गाडी वेळेवर सुटते. गाडी सुरू झाल्यानंतर थोडय़ा अंतरावर तीच गाडी किमान 5-7 मिनिटे उभी राहते. कारण बोरिवलीकडे येणारी गाडी क्रॉसिंग असल्यामुळे दुसरा इलाज नसतो. ते ठीक आहे, पण हीच गाडी वांद्रय़ाच्या पुढे कधी माहीम, माटुंगा, दादर, एल्फिन्स्टन, लोअर परळ, अगदी महालक्ष्मी स्थानक येईपर्यंत वाटेत अनेक ठिकाणी थांबत थांबत बैलगाडीसारखी संथ चालल्यामुळे प्रवासी अगदी मेटाकुटीला आले आहेत. त्यात भरीस भर म्हणजे पुन्हा काही वेळा चर्चगेट स्थानकाच्या बाहेर गाडी 5-5 मिनिटे उभी राहिल्यामुळे हीच धिमी गाडी चर्चगेट येथे 8.40 किंवा 8.45 च्या दरम्यान पोहोचायला पाहिजे तीच गाडी चर्चगेट येथे 8.55 किंवा 9 च्या दरम्यान पोहोचते. यामागचे कारण काय ते रेल्वेचे अधिकारीच जाणोत. वेळापत्रक विस्कळीत होण्याचे कारण प्रवाशांना माहीत होणे गरजेचे असताना गाडीच्या आत जे शोभिवंत डबे (लाऊड स्पीकर) आहेत त्यावर मात्र विचित्र जाहिराती ऐकवल्या जातात किंवा पुढील स्थानक कोणते याची माहिती प्रवाशांना दिली जाते. परंतु पश्चिम रेल्वेच्या सहनशील प्रवाशांना वेळापत्रक कोणत्या कारणामुळे कोलमडत आहे याची माहिती प्रवाशांना लाऊड स्पीकरवरून देण्याची कर्तव्यनिष्ठा पश्चिम रेल्वेचे संबंधित अधिकारी दाखवतील काय?

 

आपली प्रतिक्रिया द्या