कामगार चळवळ आणि बदलती संस्कृती!

570
file photo

>> पुरुषोत्तम कृ. आठलेकर

१ मे हा आंतरराष्ट्रीय कामगार तसेच महाराष्ट्र दिन म्हणून ओळखला जातो. आपण अनेक ‘डे’साजरे करण्यामध्ये धन्यता मानतो. पण आज कामगार व संघटित कामगार याची परिस्थिती काय आहे याचा विचार करताना औद्योगिक क्षेत्रेच राहिली नाही तर कामगार कुठून येणार? १९९० पासून जागतिकीकरण, आधुनिकीकरण व मुक्त आर्थिक धोरण आणि त्याचे झालेले औद्योगिक क्षेत्रावरील परिणाम पाहता केवळ सेवा क्षेत्रे विस्तारली गेली आणि स्वाभाविकच कंत्राटीपद्धतीचे उदात्तीकरण होऊ लागले आणि हळूहळू कामगार देशोधडीला लागले. त्यानंतरच्या दशकात माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रे मोठ्य़ा प्रमाणावर विस्तारली गेली. येथूनच कामगार चळवळ व संस्कृती कालबाह्य होऊ लागली. काही प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होऊ लागल्या व वर्षाकाठी आकर्षक पे-पॅकेजसुद्धा मिळू लागले त्याबदल्यात सेवा-शर्ती, कामाचे तास आणि जॉब सिक्युरिटी या सर्व गोष्टी व्यवस्थापनाच्या निर्णयावर आधारित राहिल्या. या उलट म्हणजे जेव्हा असे निर्णय एकतर्फी होत नसत तर ते कामगार संघटनांच्या वाटाघाटी आणि चर्चेत सोडवले जात असत. दोघात जर एकमत नाही झाले तर न्यायालयांतून प्रश्न सोडवले जात. त्या काळात कामगार संघटना व चळवळीचा प्रभाव होता. पुढे पुढे त्यातसुद्धा बदल होत गेले व या चळवळींना राजकीय स्वरूप प्राप्त होऊ लागले, प्रतिष्ठा मिळू लागली. त्यामुळे औद्योगिक संस्कृती व संघटना यांचा चेहराच बदलू लागला. पुढे पुढे तंत्रज्ञानात झपाट्य़ाने बदल होऊ लागले. स्वाभाविकच त्याचा मनुष्यबळावर परिणाम होऊ लागला. बदलती परिस्थिती, जागतिक स्पर्धा या निकषावर औद्योगिक धोरणे आखली गेली. यामुळे कामगार संघटनांमध्ये पेच निर्माण झाला. बदलत्या परिस्थितीत कंपनी वाचवायची का कामगारांचे हित जपत संघटना मजबूत करावयाची. त्यामुळे संघटित कामगार व ठेकेदारी कामगार याच्यात दुही निर्माण झाली. याच परिस्थितीचा फायदा घेत अनेक कंपन्यांनी आपल्या जागा विकून प्रचंड पैसा केला, काही स्थलांतरित झाल्या, तर काही दुसऱ्या कंपनीत विलीन झाल्या. येथूनच कामगार वर्ग संपलाच कुजबुज सुरू झाली, परंतु खासगीकरण, वाढती बेरोजगारी, सुरक्षित जॉब हे प्रश्न भविष्यात भेडसावणारच आहेत. त्यासाठी जीवनशैलीत व संस्कृतीत झालेले बदल आत्मसात करून संघटित होण्याची गरज आहे. आर्थिक मंदी ही काय कायमची नाही परिवर्तनाने आपण तिच्यावर मात करू शकतो, पण त्यासाठी योग्य तो दृष्टिकोन व संघर्ष करण्याची आवश्यकता आहे

आपली प्रतिक्रिया द्या