अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांसह आढळलेल्या गाडीच्या मालकाचा मृतदेह सापडला

रिलायन्स उद्योगाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या अलिशान घराशेजारी स्फोटके आणि धमकीचे पत्र असलेली चोरीची स्कॉर्पिओ गाडी सापडल्याने खळबळ उडाली होती. आता या गाडीच्या मालकाचा मृतदेह पोलिसांना आढळून आला आहे. मुंब्रा रेती बंदर रोडनवरील खाडीत या गाडीच्या मालकाचा मृतदेह आढळून आल्याचे वृत्त ‘पीटीआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेली गाडी मनसुख हिरेन यांची असल्याचे तपासात उघड झाले होते. ही गाडी चोरी झाली होती. तसेच मनसुख हिरेन हे देखील काल रात्रीपासून बेपत्ता होते. तशी तक्रार हिरेन यांच्या कुटुंबाने आज दुपारीच नौपाडा पोलीस स्थानकात दिली होती. या प्रकरणी सुरू असलेल्या तपासादरम्यान पोलिसांनी मुंब्रा रेती बंदर रोड खाडीत मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळून आला आहे.

काय आहे प्रकरण?

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या घराजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार पार्क करून चालकाने शिताफीने पळ काढला होता. बेवारस उभ्या असलेल्या या गाडीची माहिती मिळताच सर्वच तपास यंत्रणांनी त्या ठिकाणी धाव घेतली. गाडीत जिलेटिनच्या कांडय़ा, धमकीचे पत्र आणि अनेक नंबर प्लेट सापडल्यामुळे आणखीनच खळबळ उडाली. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तत्काळ या प्रकरणाचा तपास सुरू केला.

मनसुख हिरेन ठाण्यातील व्यापारी

स्कॉर्पिओ कार ठाण्यातील एका व्यापाऱ्याची असून ती विक्रोळी येथून चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले. पण ती कार कोणी चोरली, चोरून ती ठाण्याला कुठे नेण्यात आली याबाबत ठोस असे काही पोलिसांच्या हाती लागलेले नव्हते. शहरातील सीसीटीव्ही बारकाईने तपासले जात असून या दरम्यानच मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळून आला आहे. प्राथमिक तपासामध्ये हिरेन यांनी आत्महत्या केली असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

जैश उल हिंद या संघटनेने घेतली होती जबाबदारी

मुंबईत मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं भरलेली गाडी आढळली होती. ही गाडी ‘जैश उल हिंद’ या संघठनेने ठेवल्याचे समोर आले आहे. या संघटनेने एक संदेश पाठवून ही जबाबदारी घेतली होती. याच संघटनेने काही दिवसांपूर्वी दिल्लीतील इस्राईल दुतावासाबाहेर स्फोट केला होता. तसेच या संघटनेने बिटकॉईनच्या माध्यमातून पैश्यांची मागणी केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या