‘लाडकी बहीण’ योजना बंद करण्यासाठी विरोधी पक्षातील सावत्र भाऊ प्रयत्न करताहेत अशा मिंधे सरकारच्या टीकेला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिले. अडीच वर्षांत लाडकी बहीण आठवली नव्हती का, असा सवाल करतानाच, महाविकास आघाडीचे सरकार येऊ दे, आम्ही तीन हजार रुपये देऊ, असे वडेट्टीवार म्हणाले.
‘लाडकी बहीण योजना’ बंद पाडण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून होत आहे. हे आरोप फेटाळून लावत दुसऱ्याला सावत्र भाऊ म्हणता, पण खऱ्या अर्थाने महायुती सरकारच महाराष्ट्रातील महिलांचा शत्रू आहे, असे ते म्हणाले. महिला अत्याचारांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आला तेव्हा लाज वाटत नाही. दीड हजार देण्यापेक्षा महिलांच्या संरक्षणाची हमी दिली असती तर आशीर्वाद मिळाला असता, असा हल्लाबोल वडेट्टीवार यांनी केला.
दीड हजार देऊन महिलांना मारण्याचे लायसन्स मिळालेय का?
बुलढाणाच्या मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींनी पोलीस ठाण्यामध्येच एका महिलेला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला होता. त्याचा दाखला यावेळी देत वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला. पोलीस ठाण्यात भाजपच्या सभापतींकडून महिलांना मारहाण केली जाते. दीड हजार रुपये देऊन महिलांना मारण्याचे लायसन्स तुम्हाला दिले आहे का? असा संतप्त सवाल त्यांनी केला. महाराष्ट्राच्या महिलांना संरक्षणाची हमी द्या, अशी मागणीही त्यांनी केली.