इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रुट सध्या चांगल्या फॉर्मात दिसत आहे. पाकिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात त्याने खणखणीत शतक झळकावत विक्रमांना गवसणी घातली आहे. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 35 वे शतक झळकावत जगातील 4 दिग्गज माजी कर्णधारांना मागे सारले आहे. तसेच इंग्लंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो फलंदाज ठरला आहे.
मुल्तान क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात जो रुट ची बॅट तळपली आणि पाकिस्तानी गोलंदाजांवर बरसली सुद्धा. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 35 वे शतक झळकावले आहे. या शतकासोबत जो रुट कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकवणारा 6 वा फलंदाज ठरला आहे. याबाबतीत त्याने श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने, वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारा, टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावसकर आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार युनूस खान यांना मागे सारले आहे. या सर्वांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत 34-34 शतक झळकावले आहेत. जो रुटच्या पुढे आता फक्त राहुल द्रविड (36 शतक), कुमार संगकारा (38), रिकी पॉटींग (41), जॅक कॅलिस (45) आणि सचिन तेंडुलकर (51 शतक) यांचा समावेश आहे.
जो रुटने पाकिस्ताविरुद्ध ठोकलेल्या खणखणीत शतकासोबत जो रुट इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी धावा करणारा एक नंबरचा फलंदाज ठरला आहे. पूर्वी हा विक्रम एलिस्टर कुकच्या नावावार होता, त्याने 118 कसोटी सामन्यांमध्ये 8900 धावा केल्या होत्या.