दुष्काळ निवारणासाठी आमदार निधीतून 25 लाख रुपयांच्या खर्चाला मुभा

सामना प्रतिनिधी । मुंबई

राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आमदार निधीतून नळ पाणीपुरवठय़ापासून विंधन विहिरी अशा कामांसाठी 25 लाख रुपयांपर्यंतची रक्कम खर्च करण्यास मुभा देण्यात आली आहे. याचा मोठा फायदा दुष्काळग्रस्त जिह्यांतील शेतकऱयांना व जनावरांच्या चारा छावण्यांना होणार आहे.

राज्याच्या अनेक भागांत पाणीटंचाई व दुष्काळ पडला आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी सरकारने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत, पण तरीही दुष्काळग्रस्त भागात आमदार निधीतून कामे करण्यास मुभा देण्याची मागणी अनेक आमदारांनी केली होती. या मागणीची दखल घेत राज्य सरकारने 2019-20 या आर्थिक वर्षात 25 लाख रुपयांपर्यंतच्या मर्यादेत खर्च करण्यास मुभा दिली आहे.

आमदार निधीतून तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजना, नवीन नळ जोडणी उपलब्ध करून देणे, पाइपलाइन व टाकीच्या विशेष दुरुस्तीची कामे, विहिरी खोल करणे, गाळ काढणे, नवीन विंधन विहिरी बांधणे, साध्या विहिरी बांधणे, टय़ूबवेल बांधणे, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, खोलीकरण, पाणी साठवण्यासाठी पाण्याच्या टाक्या बांधणे अथवा प्लॅस्टिकच्या टाक्या बसवणे, चारा छावण्यांतील जनावरांना खाद्य देण्यासाठी बकेटस्-टब देणे, शासकीय शाळा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये पाणीपुरवठय़ासाठी आरओ प्लॅण्ट व तर साहित्य, अंगणवाडी केंद्रांना शुद्ध पाणीपुरवठय़ासाठी आवश्यक औषधे व साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी आमदार निधीचा वापर करता येईल.

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठवाडय़ासाठी वेगळा निकष जाहीर करण्याची मागणी केली. जनावरांना चारा खरेदीसाठी 90 रुपयांवरून 100 रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे, पण मराठवाडय़ातील जनावरांसाठी नगर, नाशिक, अमरावतीमधून चारा आणावा लागत असल्यामुळे चारा वाहतुकीवर प्रचंड खर्च होतो. त्यामुळे दुष्काळावर मात करण्यासाठी मराठवाडय़ासाठी वेगळा निर्णय करण्याची मागणी त्यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या