‘पानिपत’ चित्रपटावर अफगाणिस्तान नाराज, संबंध बिघडण्याची भीती

2317

मराठ्यांची लढवय्यावृत्ती आणि अहमद शहा अब्दालीच्या हिंसाचारावर आधारित आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पानिपत’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. सामान्य व्यक्तींपासून अनेक बॉलीवूड कलाकारांच्या तो पसंतीसही पडला. येत्या 6 डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. पण असे सगळे आलबेल असतानाच अफगाणिस्तानने मात्र या चित्रपटाप्रति चिंता व्यक्त केली आहे. या चित्रपटामुळे दोन्ही देशातील संबंध बिघडतील. असे पत्र अफगाणिस्तानच्या दूतावासाने हिंदुस्थानच्या माहिती आणि प्रसारणविभागाला लिहिले आहे.

हे पत्र प्रकाश जावडेकर यांना लिहण्यात आले असून यात पानिपत चित्रपटात अहमद शहा अब्दालीचे व्यक्तीमत्व ज्याप्रमाणे सादर करण्यात आले आहे ते चुकीचे आहे. यामुळे अब्दालीची प्रतिमा मलिन होऊ शकते. अफगाणिस्तानी नागरिकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. त्याचा परिणाम दोन्ही देशातील संबंधांवर होऊ शकतो, असे लिहिण्यात आले आहे. तसेच या चित्रपटात अब्दालीची भूमिका करणाऱ्या संजय दत्तलाही अफगाणिस्तानचे माजी राजदूत डॉक्टर शायदा अब्दाली यांनी संजय दत्तच्या पानिपत पोस्टरवर टि्वट केलं आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमीवर हिंदुस्थानी चित्रपटांनी दोन्ही देशातील संबंध मजबूत करण्याचे कार्य केले आहे. हीच अपेक्षा पानिपतबाबत असून आमच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण भाग यात सादर करण्याचे भान राखले जाईल, अशी आशा व्यक्त करत असल्याचे अब्दाली यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या