संतप्त बळीराजाचा मुंबईत ठिय्या, ‘राज्यपाल पळून गेले’ म्हणत निवेदन फाडून निषेध

मैलोन् मैल चालून पायाला आलेले फोड… उन्हातान्हाने रापलेली काया… घाम, थकवा, मळलेले कपडे कशा कशाची तमा न बाळगता हजारोंच्या संख्येने बळीराजा आज आझाद मैदानात एकवटला. केंद्र सरकारने केलेले कायदे अन्यायकारक आहेत, ते रद्द करा हीच भूमिका राजभवनात बसलेल्या राज्यपालांपर्यंत मोर्चाद्वारे पोहोचवायची हेच ध्येय होते. पण शेकडो मैल पायपीट करून निघालेल्या शेतकऱयाला टाळून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी गोव्यात पोहोचले. राज्यपालांच्या या होशयारीने संतप्त झालेल्या शेतकऱयांनी ‘कंगनाला भेटायला वेळ आहे, पण शेतकऱयांना नाही’ अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत राज्यपालांसाठी आणलेल्या निवेदनाचे तुकडे तुकडे केले. आता निवेदन देणार ते देशाच्या राष्ट्रपतींनाच अशी भूमिका व्यक्त करीत प्रजासत्ताकदिनाच्या झेंडावंदनासाठी शेतकऱयांनी आझाद मैदानातच ठिय्या पुकारला.

केंद्रात कृषी कायद्यांविरोधात तीन महिने आंदोलन करणाऱया शेतकऱयांना पाठिंबा देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱयातून आलेले शेतकरी तसेच कष्टकरी जनता 23 जानेवारीला आपापल्या गावांहून निघून आझाद मैदानात पोहोचली. आझाद मैदानातून हा मोर्चा राजभवनकडे निघणार होता. ‘हमारी ताकद, हमारी एकता’, ‘मोदी सरकार हाय हाय, भाजप सरकार चले जाव’ अशा घोषणांनी आझाद मैदान परिसर दणाणून गेला. पहावे तिकडे लाल झेंडे आणि ते हातात घेऊन केंद्र सरकारविरोधात घोषणा देणारे शेतकरी असेच वातावरण होते. या आंदोलनात अशोक ढवळे, अजित नवले, प्रकाश रेड्डी, मेधा पाटकर, उल्का महाजन यांच्यासह विविध शेतकरी संघटनांचे नेते तसेच महाविकास आघाडी सरकारमधील नेतेही सहभागी झाले.

राज्यपालांसाठीच्या निवेदनाच्या चिंधडय़ा चिंधडय़ा

राज्यपालांना भेटण्यासाठी 23 जणांचे शिष्टमंडळ जाणार आहे. त्यासाठीची यादीही राजभवनाला पाठविण्यात आली होती. मात्र राज्यपाल स्वतः वेळ देऊनही उपस्थित नसल्याने संयुक्त मोर्चा चांगलाच आक्रमक झाला. राज्यपालांच्या या कृतीचा निषेध करीत संयुक्त मोर्चाच्या वतीनं राजभवनावर जाण्याचा निर्णय रद्द करण्यात आला. मोर्चा जिथपर्यंत पोहोचला तिथेच शेतकऱयांना पुढील आंदोलनाची दिशा सांगत राज्यपालांसाठीच्या निवेदनाच्या चिंधडय़ा चिंधडय़ा करून त्या हवेत भिरकावण्यात आल्या.

राज्यपालांची कृती महाराष्ट्रातील जनतेचा अपमान – अशोक ढवळे

राज्यपालांनी स्वतः वेळ दिली होती. त्यांनी स्वतः दिलेल्या भेटीनंतर पळून गेले. गोव्यात राज्यपाल मजा मारायला गेले. राज्यपालांची ही कृती महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे. श्रमिक, कष्टकरी, कामगारांचा हा अवमान राज्यपालांनी केला आहे. राज्यपाल भाजपचे पुढारी होते. ते आरएसएसचे प्रचारक अजूनही आहेत, त्यामुळे याबाबत आम्हाला आश्चर्य वाटत नाही. राज्यपालांच्या सचिवांना निवेदन देणार नाही. आता हे निवेदन राष्ट्रपतींना पाठवणार आहोत. आज एकजुटीनं आणि ताकतीनं आपण मोर्चा काढला. उद्या प्रजासत्ताक दिन आहे. उद्या 26 जानेवारीला तिरंग्याला वंदन करून आपण घरी जायचं आहे, असे आवाहन शेतकरी नेते अशोक ढवळे यांनी यावेळी शेतकऱयांना केले.

महाविकास आघाडीचा भक्कम पाठिंबा

शेतकऱयांच्या या आंदोलनाला महाविकास आघाडी सरकारने भक्कम पाठिंबा दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, नरसय्या आडाम, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप, प्रवत्ते सचिन सावंत हेही आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले. यावेळी सर्वच नेत्यांनी शेतकऱयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही देत गावागावात आंदोलन पोहोचविण्यासाठी शेतकऱयांना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे सचिन सावंत, भाई जगताप, विद्या चव्हाण आदी नेत्यांनी मोर्चात सहभाग होत शेतकऱयांच्या आंदोलनाला ताकद दिली.

राजभवनातून खुलासा

शेतकऱयांकडून व्यक्त होत असलेल्या संतापानंतर राजभवनाकडू खुलासा करण्यात आला. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे गोवा राज्याच्या राज्यपाल पदाचा अतिररिक्त कार्यभार आहे. 25 जानेवारी रोजी ते गोवा विधानसभेच्या प्रथम सत्राला संबोधित करणार असल्याने त्या दिवशी शेतकरी शिष्टमंडळास भेटू शकणार नाहीत, असे आधीच स्पष्ट करण्यात आल्याचे आज राजभवनकडून सांगण्यात आले. संयुक्त शेतकरी मोर्चाचे धनजंय शिंदे यांना 22 जानेवारी रोजी दूरध्वनीद्वारे तसेच निमंत्रक प्रकाश रेड्डी यांना 24 जानेवारी रोजी लेखी पत्राव्दारे राज्यपालांच्या अनुपलब्धतेबद्दल कळविण्यात आले होते. शिंदे यांनी व्हॉटसअॅप संदेशाद्वारे निरोप मिळाल्याचे मान्य केले होते. राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष पुमार शिष्टमंडळाकडून 25 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता निवेदन स्वीकारतील असेही कळविण्यात आल्याचे राजभवनातून सांगण्यात आले.

मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला

कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करीत आझाद मैदानाहून दुपारी राजभवनाच्या दिशेने मोर्चा निघाला. मात्र न्यायालयाच्या निर्देशानुसार दक्षिण मुंबईत मोर्चाला परवानगी नसल्याने हा मोर्चा मेट्रो सिनेमाजवळच अडविण्यात आला. तेथून 23 जणांचे शिष्टमंडळ राजभवन येथे राज्यपालांना निवेदन देण्यासाठी पोहोचणार होते. मात्र राज्यपाल शेतकऱयांना टाळून गोव्यात पोहोचल्याचे कळताच राज्यपालांविषयी तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. राज्यपाल आम्हाला टाळून गोव्यात पळाले. त्यांना कोणतीही नैतिकता नाही. गोव्यात मजा करण्यासाठी गेले काय, अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱयांकडून व्यक्त करण्यात आल्या.

आपली प्रतिक्रिया द्या