विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील झोपडय़ांचे स्थलांतरणाचे काम प्रलंबित

मुंबईतील विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील झोपडय़ांच्या स्थलांतरणाबाबतच्या संपूर्ण कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी एका प्रशासकीय अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची विनंती शिवसेना आमदार संजय पोतनीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

मुंबई विमानतळाच्या जागेवरील झोपडय़ांच्या स्थलांतरणाचे काम सध्या प्रलंबित आहे. सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. रहिवासी स्थलांतराच्या प्रतीक्षेत असल्यामुळे कोणतीही विकासात्मक कामे करता येत नाहीत. त्यामुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. 2014 पासून मी संसदीय आयुधांद्वारे विधानसभेत प्रश्न उपस्थित केला आहे. अनेकवेळा बैठका झालेल्या आहेत, पण अद्यापपर्यंत निर्णयात्मक ठोस कार्यवाही झालेली नाही.

11 नोव्हेंबर 2020 रोजी ‘वर्षा’ निवासस्थानी आपल्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कलिना व चांदिवली विधानसभा क्षेत्रातील विमानतळ प्राधिकरणास  रिक्त करून हव्या असलेल्या बारा पॉकेटअंतर्गत येणाऱ्या बाधित झोपडीधारकांच्या स्थलांतरणाबाबत कालबद्ध कार्यक्रम त्वरित ठरवा असे आपण प्रशासकीय अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते, पण त्यानुसार अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही. संपूर्ण स्थलांतरणाच्या कामकाजावर कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे कामास गतीच मिळत नाही, असे मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात आमदार संजय पोतनीस यांनी नमूद केले आहे.

पात्रता-अपात्रतेच्या संदर्भातील अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. परिशिष्ट-2 यादीचे काम पूर्ण झालेले नाही. पात्रता निश्चित करण्याबाबतचे काम अत्यंत धीम्या गतीने होत आहे. विद्याविहार येथील एचडीआयएलने बांधलेल्या इमारतींमध्ये झोपडपट्टीधारकांना स्थलांतरित करण्याबाबत निर्णय झालेला आहे. पण ही इमारत बांधल्यापासून वापर नसल्यामुळे इमारतीची दुरवस्था झाली आहे. विमानतळ प्राधिकरणामार्फत इमारतीच्या दुरुस्तीच्या कामाबाबत कोणतीही कार्यवाही सुरू झालेली नाही. त्यामुळे विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील झोपडय़ांच्या स्थलांतरणाच्या कामावर संपूर्ण लक्ष ठेवण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी व संबंधित विभागांनी स्थलांतरणाबाबत केलेल्या कार्यवाहीची इत्थंभूत माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयास नियमितपणे देण्याची सूचना करावी अशी विनंती या पत्रात केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या