मुंबई विमानतळाला सर्वोत्कृष्ट पर्यटन पुरस्कार

403

पर्यटन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रल्हादसिंह पटेल यांच्या हस्ते देशातील सर्वोत्कृष्ट पर्यटकपूरक विमानतळाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्यातील अन्य तीन संस्थांनाही सन्मानित करण्यात आले. यावेळी देशाच्या पर्यटन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे राज्य, संस्था व व्यक्तींना विविध श्रेणीत सन्मानित करण्यात आले. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे सचिव योगेंद्र त्रिपाठी आणि जागतिक पर्यटन संस्थेचे महासचिव झुराब पोलोलीकाशवीली यावेळी मंचावर उपस्थित होते.

विमानतळांच्या श्रेणीत देशातील दोन विमानतळांना सन्मानित करण्यात आले. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला उच्च दर्जाच्या पर्यटक सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वोत्कृष्ट विमानतळाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विमानतळाच्या एरो कमर्शियल विभागाचे उप महाव्यवस्थापक आदित्य पंसारी आणि सहायक महाव्यवस्थापक तन्वीर मौलवी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

नाशिक व मुंबई येथील हॉटेल्सचाही सन्मान

नाशिक शहरातील ‘एक्सप्रेस इन हॉटेल’ हे देशातील सर्वोत्कृष्ट तीन तारांकित हॉटेल ठरले आहे. आधुनिकतेसह पारंपरिक वास्तुशैलीचा उत्तम नमुना असलेले हे हॉटेल पर्यटक व अतिथींना उत्तम सुविधा देणारे हॉटेल ठरले आहे. मुंबई येथील ‘द ललीत हॉटेल’ हे वैविध्यपूर्ण बैठक व्यवस्था पुरविणारे देशातील सर्वोत्तम हॉटेल ठरले आहे. छोटेखानी बैठकीपासून लग्नसमारंभ, व्यावसायिक संमलेन आयोजनासाठी या हॉटेलने पुरविलेल्या वैविध्यपूर्ण सेवांची या पुरस्कारासाठी दखल घेण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या