अंधेरीत वृद्ध महिलेची हत्या

71

अंधेरीत राहणाऱ्या वृद्ध महिलेची साडीने गळा आवळून हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. गुलाबी नारायण शेट्टी असे मृत महिलेचे नाव आहे. तिच्या हत्येप्रकरणी डी. एन. नगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अंधेरी पश्चिमच्या वालिया कॉलेजसमोरील गणपती मंदिरासमोरील वरच्या बाजूस गुलाबी या एकटय़ाच राहत असायच्या, तर त्यांची मुलगी अंधेरी, चार बंगला परिसराजवळ राहते. रविवारी दुपारी तीन वाजता गुलाबी यांच्या भाचीने त्यांना फोन केला. मात्र गुलाबी यांनी फोन उचलला नाही. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्या घरी गेल्या तेव्हा गुलाबी या बाथरूममध्ये पडल्या होत्या. त्यांचे हातपाय बांधलेले होते. साडीने गळा आवळून त्यांची हत्या केली होती.

या घटनेची माहिती समजताच डी. एन. नगर पोलीस घटनास्थळी गेले. पोलिसांनी गुलाबी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवला. तपासादरम्यान पोलिसांनी गुलाबी यांच्या भाचीचा जबाब नोंदवून घेतला. नेमकी गुलाबी यांची हत्या कोणत्या कारणावरून झाली हे स्पष्ट झालेले नाही. गुलाबी यांना हॉटेलचे दरमहिन्याला भाडे येत असायचे. परिचित व्यक्तीने चोरीच्या उद्देशाने हत्या केली असावी असा पोलिसांना संशय आहे. तपासाकरिता एक पथक तयार केले आहे. पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या