भीक मागण्यासाठी उचलून नेले, एक वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या अपंग तरुणाला अटक

431

लहान बाळ सोबत असेल तर भीक जास्त मिळेल म्हणून एका अपंग तरुणाने पिला हाऊस परिसरातून एक वर्षाच्या मुलाचे अपहरण केले. तो मुलाला भीक मागत थेट अहमदाबादमध्ये जाऊन धडकला. तेथे एका दर्ग्याजवळ भरलेल्या मेळ्यामध्ये मुलाला पुढे करून भीकदेखील मागू लागला. पण व्ही. पी. रोड पोलिसांनी त्या अपंग तरुणाचे मनसुबे उधळून लावत त्याला बेडय़ा ठोकल्या आणि मुलाला सुखरूप ताब्यात घेतले.

पिला हाऊस परिसरात नजमा शेख ही विवाहिता तिच्या एक वर्षाचा मुलगा दानिशसोबत फुटपाथवर राहते. 2 मार्च रोजी सोनू दुबे (25) हादेखील त्या फुटपाथवर येऊन राहू लागला. त्याने तेथे राहणाऱया सर्वांशी ओळख करून घेतली. परंतु आपल्याबद्दल काहीच सांगितले नाही. दरम्यान, 3 मार्चच्या दुपारी साडेबाराच्या सुमारास दानिश एकटाच असल्याची संधी साधत सोनू त्याला घेऊन पसार झाला. त्यानंतर बराचवेळ दानिश दिसेनासा झाल्यामुळे नजमाने व्ही. पी. रोड पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. याची तत्काळ दखल घेत वरिष्ठ निरीक्षक गुलाबराव मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सिद्धेश जोष्टे, राजाराम पोळ, सचिन आव्हाड, अंमलदार रूपेश पवार, वैभव गिरकर, मारुती कुंभार, मोसिन शेख पथकाने तत्काळ तपास सुरू केला. पथकाने परिसरातील सीसीटीव्ही तपासले तेव्हा तो अपंग तरुण व्हिलचेअरवरून दानिशला घेऊन जाताना दिसला. त्यानुसार पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता आरोपी चर्नी रोडला लोकलमध्ये बसला. तेथून तो अंधेरीला गेला आणि मग वांद्रे टर्मिनसला येऊन आरावली एक्स्प्रेसने निघून गेल्याचे समोर आले. मग आरोपी अजमेरला गेल्याचे कळताच पोलीस तेथेही गेले, पण तेथे त्याचा शोध लागला नाही. अहमदाबाद स्थानकाबाहेर पडताना आरोपी फुटेजमध्ये दिसला आणि पोलिसांचे अर्धेअधिक काम झाले.

उरूसमध्ये भीक मागत होता

पोलिसांनी अहमदाबादमध्ये जाऊन खबऱयांना कामाला लावले. तेव्हा अहमदाबादपासून 120 किमीवर एका दर्ग्यात उरूस भरला असून तेथे एक अपंग तरुण बाळालासोबत घेऊन भीक मागत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार जोष्टे व पथकाने त्या ठिकाणी धडक देऊन सोनू दुबेला पकडून चिमुकल्या दानिशची सुटका केली.

आपली प्रतिक्रिया द्या