प्रामाणिकपणात मुंबई शहर जगात दुसरं! ‘पाकिट’ सर्वेक्षण अहवालात खुलासा

मुंबई या शहराला स्वतंत्र ओळख आहे. आर्थिक राजधानी असो किंवा स्वप्ननगरी… मुंबई प्रत्येकाला आपलंसं करून घेणारं शहर आहे. आता मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षण अहवालात मुंबई हे जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं प्रामाणिक लोकांचं शहर म्हणून नावाजलं गेलं आहे. रिडर्स डायजेस्ट नावाच्या नियतकालिकाने केलेल्या एका अनोख्या सर्वेक्षणात हा खुलासा झाला आहे.

चार खंडांतील देशांच्या महत्त्वाच्या 16 शहरांमध्ये हे सर्वेक्षण केलं गेलं. या शहरांच्या वेगवेगळ्या भागात पैशांनी भरलेली पाकिटं टाकली गेली. त्यानंतर परत आलेल्या पाकिटांच्या संख्येच्या बळावर प्रामाणिक शहरांची यादी काढली गेली.

उत्तर अमेरिका, यूरोप, दक्षिण अमेरिका, आशिया या खंडांच्या विविध शहरांत ही पाकिटं टाकली गेली. त्यात मोबाईल नंबर, कौटुंबिक फोटो, कूपन, बिझनेस कार्ड्स आणि स्थानिक चलन असा ऐवज भरला होता. ही पाकिटं बगिचे, मॉल्स तसंच रस्त्यांच्या कडेला टाकण्यात आली आणि त्या पाकिटांचं काय होतं, त्यावर पाळत ठेवण्यात आली.

सर्वेक्षणात पहिला क्रमांक फिनलँडच्या हेलसिंकी शहराने लावला. तिथे ठेवल्या गेलेल्या 12 पाकिटांपैकी 11 लोकांनी पाकिटं परत केली. तर मुंबईत 12 पैकी 9 जणांनी पाकिटं परत केली. त्यामुळे या यादीत मुंबईचा दुसरा क्रमांक लागला आहे. महिंद्रा अँड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या