कुत्र्याला ‘कुत्रा’ म्हटल्याने रिक्षाचालकाला मारहाण

आपल्या पाळीव श्वानाला ‘कुत्रा’ असे म्हटल्याने मुंबईत एका 25 वर्षीय तरुणाने ज्येष्ठ व्यक्तीला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. हल्लेखोर तरुण हा भांडुप येथील रहिवासी असून त्याने 60 वर्षीय ऑटोरिक्षा चालकावर हल्ला केला. या हल्ल्यात रिक्षाचालकांच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या आहेत. आरोपी राहुल भोसले याने रिक्षाचालकाकडे आपल्या पाळीव श्वानाला ‘लुसी’ या नावाने हाक मारण्याचा आग्रह धरला होता.

पोलीस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसले याच्यावर भांडुप पोलीस ठाण्यात पाच ते सहा गुन्ह्यांची नोंद आहे. तो मे २०२१ ते मे २०२२ या कालावधीत मुंबई शहरातून फरार होता. वरील घटनेची तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपी भोसलेला लगेचच अटक करण्यात आली आणि कोर्टात रिमांडसाठी पाठवण्यात आले.

मंगळवारी रात्री 10.30 च्या सुमारास रिक्षाचालक शिवसागर पाटील (60) हे घरी परतत असताना ही घटना घडली. ते भांडुपमधील म्हाडा कॉलनीत पोहोचले. यावेळी राहुल भोसलेने त्यांना बोलावले आणि रस्त्यावरील कुत्र्यांवर लक्ष ठेवण्यास सांगितले. यावेळी पाटील यांनी ‘कुत्रा’ कुठेच दिसत नाही असे म्हटले. मात्र ‘कुत्रा’ या शब्दाचा श्वान मालक भोसले याला राग आला. त्याने त्याच्या पाळीव श्वानाचा उल्लेख ‘कुत्रा’ असा न करता ‘लुसी’ असे करण्यास सांगितले. त्यानंतर संतापलेल्या भोसलेने पाटील यांच्या रिक्षाला लाथा मारण्यास सुरुवात केली. यावरून दोघांमध्ये हाणामारी झाली. यावेळी शिवीगाळ केल्यानंतर भोसले याने पाटील यांची कॉलर पकडून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.

हाणामारीत भोसले याने पाटील यांच्या तोंडावर ठोसा मारला आणि अंगावर वार केले. यात पाटील यांना दुखापत झाली आणि चेहेऱ्यातून रक्त येऊ लागले. यावेळी उपस्थितांनी मध्यस्थी केल्याने वाद मिटला. यानंतर पाटील यांनी मुलुंडच्या सामान्य रुग्णालयात उपचार घेतले. मध्यरात्रीच्या सुमारास पाटील यांनी भांडुप पोलिसांत जाऊन आपला जबाब नोंदवला. यानुसार हल्लेखोर व्यक्तीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी भोसले याला अटक करण्यात आल्याची माहिती भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नितीन उन्हवणे यांनी दिली.