आमचा रंग आणि अंतरंग भगवेच! शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठणकावले

2456

आम्ही भगवा खाली ठेवलेला नाही. आमचा रंग आणि अंतरंग भगवेच आहे असे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी ठामपणे सांगितले तेव्हा वांद्रे-कुर्ला संकुलात जमलेल्या हजारोंच्या गर्दीने ‘शिवसेना झिंदाबाद’चा एकच जयघोष केला. बीकेसीत आज सायंकाळी अत्यंत नेत्रदीपक, डोळ्यांचे पारणे फेडणारा भव्यदिव्य दिमाखदार वचनपूर्ती सोहळा संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेसाठी झटलेल्या अकरा ज्येष्ठ शिवसैनिकांच्या हस्ते हा सत्कार सोहळा झाला तेव्हा अत्यंत भारावलेल्या स्वरात उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनेसाठी ज्यांनी लाठय़ा झेलल्या, रक्त सांडले त्या तमाम शिवसैनिकांच्या चरणी मी माझे मुख्यमंत्रीपद नम्रपणे समर्पित करतो… तेव्हा टाळ्यांच्या कडकडाटाने अवघा आसमंत निनादला!

वांद्र-कुर्ला संकुलात तब्बल तीन तास रंगलेला प्रेक्षणीय सोहळा खरोखरच दिमाखदार आणि भव्यदिव्य असाच होता. मराठी सिने-नाटय़सृष्टीतील अनेक तारकादळे रंगमंचावर अवतरली होती. परिवहन मंत्री, विभागप्रमुख ऍड. अनिल परब यांच्या नेटक्या संयोजनामुळे हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगतच गेला. मुंबईतील सर्व विभागप्रमुखांच्या हस्ते यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला, तर शिवसेना महिला आघाडीतर्फे सौ. रश्मी ठाकरे यांची साडी-चोळी देऊन ओटीही भरण्यात आली.

या सत्काराला उत्तर देताना शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचा बुरखा पुन्हा एकदा फाडला. ‘मातोश्री’वरील शिवसेनाप्रमुखांच्या खोलीत, म्हणजे तमाम शिवसैनिकांच्या मंदिरात दिलेला शब्द भाजपने फिरवला. नुसता शब्द फिरवलाच नाही, तर मला खोटं ठरवण्याचा प्रयत्न झाला. म्हणून मी वेगळा मार्ग स्वीकारला. मागील 30-40 वर्षांत जे आपले विरोधक होते त्यांचा हात हातात घेऊन मी सरकार स्थापन केलं. जे केलं ते उघडपणे केलं, चोरूनमारून केलेलं नाही. याचा अर्थ अनेकांना वाटतो तसा नाही, की हा भगवा आम्ही खाली ठेवला. हा भगवा आम्ही अजिबात खाली ठेवलेला नाही. ना आमचा रंग आम्ही बदलला, ना आमचं अंतरंग बदललं. आमचं अंतरंगसुद्धा भगवंच आहे, आमचा रंगसुद्धा भगवाच आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीकाकारांना ठणकावले.

आमचा चेहरा उघड झाला, पण तुम्ही अख्खेच्या अख्खे उघडे झालात!

मला सर्व जुने 23 जानेवारी आठवतात. हाच तो दिवस. पाच ते सहा वर्षांपूर्वी याच दिवशी आपण शिवबंधन बांधून महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याची शपथ घेतली तो हाच दिवस. मधल्या काळात टीका झाली की त्यावेळी शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला. 2014 साली तुम्ही आमच्यासोबत युती तोडली होती. कट्टर हिंदुत्ववादी शिवसेनेशी युती तुम्ही तोडली होती तेव्हा तुम्ही अदृश्य हाताच्या आधाराने सरकार स्थापन केलं होतं. आता दिलेला शब्द मोडल्यानंतर आमचा चेहरा उघड झाला असेल, पण तुम्ही अख्खेच्या अख्खे उघडे झाले आहात. हे पूर्ण दुनियेने बघितलेलं आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

वचनपूर्ती नव्हे, तर वचनपूर्तीच्या दिशेनं टाकलेलं पहिलं पाऊल

ही माझी वचनपूर्ती नाही, तर त्या वचनपूर्तीच्या दिशेनं टाकलेलं हे पहिलं पाऊल आहे. मी शिवसेनाप्रमुखांचा हात हातात घेऊन शपथ घेतली आहे ती त्यांचा शिवसैनिक मुख्यमंत्रीपदावर बसवण्याची. ही जबाबदारी मी जरूर स्वीकारली ती एवढय़ासाठीच की, ज्यावेळी तेव्हाच्या आपल्या मित्रपक्षाने दिलेलं वचन मोडलं. शिवसेनाप्रमुखांच्या खोलीत, त्या मंदिरात दिलेला शब्द खाली पाडला आणि हा शब्द खाली पाडताना असं काही ठरलंच नव्हतं असं म्हणून मला खोटं पाडण्याचा प्रयत्न केला. मी नुसता उद्धव ठाकरे नाही, तर मी उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. मी डरणारा नाही, तर लढणारा आहे. तुमचा कुटुंबप्रमुख म्हटल्यानंतर जे मी बोललो ते बोललो. तुमच्यासमोर त्यांनी मला खोटं पाडण्याचा प्रयत्न केला. असे असताना तुमच्या मनात तरी माझ्याबद्दल काय भावना निर्माण झाली असती, शिवसेनाप्रमुखांचा पुत्र खोटं बोलतोय. हे कदापि होणं नाही. प्राण गेला तरी बेहत्तर, मी शिवसैनिकांशी आणि जनतेशी खोटं बोलणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्रीपदाचा मान, सन्मान शिवसैनिकांच्या चरणी समर्पित

मी ही जबाबदारी स्वीकारेन हे माझ्या स्वप्नातही कधी नव्हतं. मी शिवसेनाप्रमुखांना मुख्यमंत्री होईन असं कधीही वचन दिलेलं नाही, पण ही जबाबदारी मी स्वीकारली. मुख्यमंत्रीपदाची जेव्हा शपथ घेत होतो तेव्हा माझे, शिवसेनाप्रमुखांचे साथी-सोबती शिवसैनिक माझ्या डोळय़ांसमोर आले. हे माझं मुख्यमंत्रीपद, हा माझा मान आजपर्यंत जे जे शिवसेनेचे नेते, जे शिवसैनिक, ज्यांनी शिवसेनेसाठी खस्ता खाल्ल्या, रक्त सांडलं, बलिदान दिलं त्यांच्या चरणी नम्रपणे समर्पित करतो, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

शिवसैनिक हेच माझं सुरक्षाकवच!

मी शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून जनतेसमोर नतमस्तक झालो तीच माझी भावना आजही आहे. यापुढची लढाई लढण्यासाठी मला तुमची साथसोबत, संगत हवी आहे. हेच माझं सुरक्षा कवच आहे. हे जोपर्यंत माझ्यासभोवती आहे तोपर्यंत मला कुणाचीही पर्वा नाही. बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, एकच विनंती आहे, जो विश्वास तुम्ही माझ्यावर, शिवसेनाप्रमुखांच्या पुत्रावर दाखवत आला आहात त्या विश्वासाचा घात होणे कधीही या कुटुंबाकडून शक्य नाही. जन्मोजन्मी हे कुटुंब तुमचे ऋणी राहील, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

उद्योग मंत्री सुभाष देसाई, पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, कृषी मंत्री दादा भुसे, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, राज्यमंत्री शंभुराज देसाई, बच्चू कडू यांच्यासह शिवसेना नेते मनोहर जोशी, दिवाकर रावते, ऍड. लीलाधर डाके, खासदार गजानन कीर्तिकर, माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा सत्कार या वेळी करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर शिवसेनानेते खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

हा सत्कार स्वीकारला, कारण…

मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मी एकही सत्कार सोहळा स्वीकारलेला नाही, पण आजचा हा सत्कार मी मुद्दाम स्वीकारला. कारण हा सत्कार माझा नाही, तर हा सत्कार तुमचा आहे. मी जरूर तुमचा कुटुंबप्रमुख आणि सेनापती आहे आणि मैदानात उतरल्यानंतर जी जबाबदारी खांद्यावर येईल त्या जबाबदारीपासून मी कधीही पळ काढला नाही आणि काढणार नाही, असे उद्धव ठाकरे ठामपणे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या