बीकेसीत रंगला जल्लोष 2020

517

भव्यदिव्य रंगमंच, चित्ताकर्षक रोषणाई, दिग्गज कलाकारांचे परफॉर्मन्स आणि हजारो शिवसैनिकांचा गगनभेदी जयघोष अशा भारावलेल्या वातावरणात शिवसेनेचा वचनपूर्ती सोहळा आज वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मैदानावर पार पडला. यावेळी ‘जल्लोष 2020’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिनय, नृत्य, संगीत, विनोद आदी विविध कलाविष्कारांनी सोहळय़ाला रंगत आणली.

विधान भवनावर भगवा फडकवण्याचे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिलेल्या वचनाची पूर्ती झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यानिमित्त हा वचनपूर्वी सोहळा परिवहन मंत्री ऍड. अनिल परब यांच्या संयोजनाखाली आयोजित करण्यात आला होता. घरातला, हक्काचा माणूस मुख्यमंत्री झाला. कलेचे पुजारी, कलाकारांना खूप प्रेम देणारे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले अशा भावना व्यक्त करत पार्श्वगायक शंकर महादेवन यांनी गणपती स्तवनाने कार्यक्रमाचा शुभारंभ केला. ‘सूर निरागस हो’ हे गीत त्यांनी सादर केले.

या सोहळय़ाचे सूत्रसंचालनही प्रसिद्ध कलावंतांनी केले. त्यात सुबोध भावे, अभिजित खांडकेकर, मधुरा वेलणकर, सुशांत शेलार, शरद केळकर, दिगंबर नाईक आदींचा समावेश होता. कार्यक्रमाचे दिग्दर्शन शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांनी केले.

लावणी अप्सरांचा ठसका

अमृता खानविलकर आणि सोनाली कुलकर्णी या लावणी अप्सरांनी आपल्या अप्रतिम नृत्यांनी उपस्थितांची वाहवा मिळवली. ‘पिंगा ग पोरी पिंगा’ या गीतावर या दोन लावण्यवतींनी केलेल्या नृत्याला शिट्टय़ा आणि टाळय़ांनी दाद मिळाली.

शिवसेना गीतांवर हजारोंची गर्दी थिरकली

पार्श्वगायक अवधूत गुप्ते यांनी सादर केलेल्या शिवसेना गीतांवर यावेळी हजारोंची गर्दी अक्षरशः थिरकली. ‘जात-गोत्र-धर्म आमचा’ या गाण्यावर शेकडो भगवे झेंडे उंचावून शिवसैनिकांनी जल्लोष केला. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीतावर महाराष्ट्राचा जयजयकार झाला.

अजय-अतुल यांची कृतज्ञता

संगीतकार अजय-अतुल यांनी यावेळी आपला संगीत कार्यक्रम सादर करतानाच बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. बालपणी त्यांच्या पोवाडय़ाचे शिवसेनाप्रमुखांनी कौतुक केले होते. ती आठवण सांगतानाच त्यांनी पोवाडय़ाच्या काही पंक्तीही सादर केल्या. गाजलेल्या झिंगाट गाण्यावर त्यांनी उपस्थितांना अक्षरशः नाचायला लावले. अभिनेता श्रेयस तळपदे यानेही मराठी-हिंदी गीतांवर ताल धरला. बेला शेंडे याच्या जादूई सुरांनीही श्रोत्यांवर मोहिनी घातली.

कर हर मैदान फतेह

पार्श्वगायक सुखविंदर सिंग यांनी त्यांच्या वरच्या पट्टीत सादर केलेले ‘कर हर मैदान फतेह’ हे गीत शिवसेनेच्या विजयामागे शिवसैनिकांनी केलेल्या अथक परिश्रमाची आठवण करून देणारे ठरले. पार्श्वगायक कुणाल गांजावाला यांनी ‘खारी बिस्कीट’ आणि ‘पानिपत’ या चित्रपटांतील त्यांची गीते सादर केली.

महाराष्ट्राची लोकसंस्कृती अवतरली

लोकनृत्यांच्या माध्यमातून यावेळी महाराष्ट्राची लोकसंस्कृतीच रंगमंचावर अवतरली. वासुदेवाचं दान पावलं, आई भवानीचा जागर झाला. तारपा नृत्य सादर करायला खास मोखाडा येथून आदिवासी बांधव आले होते. कोळीगीतांनाही उपस्थितांनी चांगली दाद दिली.

ढोल-ताशे, तालवाद्यांची जुगलबंदी

‘वंदन’ या ढोल-ताशा पथकाबरोबर प्रसिद्ध तालवादक पद्मश्री शिवमणी यांची जुगलबंदी यावेळी रंगली. शिवमणी यांच्या अप्रतिम तालवादनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध करून टाकले.

‘चला हवा येऊ द्या’ची विनोदाची खसखस

‘चला हवा येऊ द्या’च्या टीमने जल्लोष 2020 सोहळय़ात एक भन्नाट विनोदी परफॉर्मन्स सादर करून विनोदाची खसखस पिकवली. डॉ. नीलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे यांच्या हजरजबाबी विनोदाने सर्वांना हसून हसून लोटपोट केले. आईवडिलांना दिलेले वचन मुलांनी पूर्ण केले पाहिजे याचा आदर्श उद्धव ठाकरे यांच्याकडून घ्यावा असे आवाहनही त्यांनी विनोदाच्या प्रभावी माध्यमातून केले.त येणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या