पालिकेची ‘बॉडी बॅग’खरेदी केंद्र शासनाच्या निकषांनुसारच, भाजपच्या आंदोलनाची शिवसेनेकडून पोलखोल

1884

केंद्रीय रेल्वे खात्याकडून बॉडी पॅकिंगसाठी 7 हजार 717 रुपये दराने बॅग खरेदी केली जात असून याआधी फडणवीस सरकारच्या काळात, भाजपची सत्ता असलेल्या पुणे, संभाजीनगर, गडचिरोली, पालघर अशा ठिकाणीही याच दराने आणि निकषांनुसार ‘बॉडी बॅग’ची खरेदी करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रभाव असताना मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या निकषांनुसारच ‘बॉडी बॅग’ची खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे भाजपने आज पालिकेत केलेले आंदोलन म्हणजे केवळ नौटंकी असल्याचे सांगत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आंदोलनाची पोलखोल आहे.

पालिकेच्या ‘बॉडी बॅग’ खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत आज भापजने पालिका मुख्यालयात आंदोलन करीत घोषणाबाजी केली. मात्र हे आंदोलन म्हणजे नाहक केलेले राजकारण असल्याची टीका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केली आहे. पालिकेने बॉडी बॅगची खरेदी ‘डब्ल्यूएचओ’च्या निकषानुसार आणि मायक्रोबायोलॉजिकल टेस्ट केलेल्याच घ्याव्यात यासाठी मे महिन्यातच पालिका आयुक्तांना पत्र दिल्याचेही स्पष्ट केले. बॉडी बॅगच्या खरेदीच्या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर, आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले यांनीदेखील स्वत: पाहणी करून केंद्र शासनाच्या निकषानुसार बॅग खरेदी होत असल्याचे स्पष्ट केल्याचे ते म्हणाले. बॉडी बॅगची खरेदी कुणी एक व्यक्ती करीत नसून नऊ डॉक्टरांची तांत्रिक समिती वेगवेगळ्या कंपन्यांचे नमुने तपासूनच करीत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले होते. असे असताना बाराशे रुपयांची बॅग पालिका चढ्या भावाने बॉडी बॅग खरेदी करीत असल्याच्या आरोपात तथ्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजप कर्मचार्‍यांच्या आरोग्याची जबाबदारी घेणार का!

कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यास तातडीने बॉडी पॅकिंग करून पुढील कार्यवाही करणे गरजेचे असते. काही वेळा नातेवाईक आले नाहीत तर हे मृतदेह शवागृहात जास्त वेळ राहतात. त्यामुळे या बॅगा दर्जेदार असल्याच पाहिजेत. असे असताना भाजपकडून कमी दर्जाच्या आणि कमी किमतीच्या बॅगा खरेदी करण्यास सांगणे म्हणजे बॉडीच्या संपर्कात येणार्‍या कर्मचार्‍यांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार आहे. बीजेपी आता पुण्यासह इतर ठिकाणीही आंदोलन करणार का असा सवालही त्यांनी केला. विशेष म्हणजे आता भाजपकडून सभा घेतल्या जात नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र ज्यावेळी सर्व खबरदारी घेऊन मार्चमध्ये सभा घेतली जात होत्या तेव्हा भाजपचे आशीष शेलार, भालचंद्र शिरसाट, प्रभाकर शिंदे सभांवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेत होते. त्यामुळे भाजपची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोपही स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केला आहे.

पालिका म्हणते, ‘बॉडी बॅग’ स्पेशलाइज!

बॉडी बॅग्स खरेदी करण्यासाठी तिसर्‍या वेळी निविदेला प्रतिसाद मिळाल्यानंतर प्रतिबॅग 6 हजार 700 रुपये या दरात उपलब्ध झाली. मात्र शासनाच्या संकेतस्थळावर ही किंमत 7 हजार 800 दिसत आहे. शिवाय या बॅगा केंद्र शासनाच्या निकषांनुसार सुरक्षित आणि बिनटाका ‘स्पेशलाइज’ पद्धतीच्या आहेत. यानुसार आतापर्यंत 2 हजार 200 बॅगा खरेदी करण्यात आल्या आहेत. यामुळे विषाणूचा प्रादुर्भाव होण्यास अटकाव बसत आहे. दरम्यान आगामी काळासाठीही 23 मे रोजी बॅगा पुरवठ्यासाठी निविदा काढण्यात आली होती. मात्र सदर निविदेला तांत्रिक निकषांत बसणार्‍या संस्थांकडून प्रतिसाद मिळाला नसल्याने पुन्हा निविदा काढण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. दरम्यान, पालिका सीएसआर फंडातून मिळालेल्या बॉडी बॅगा वापरत असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या