‘नायर’मध्ये आणखी दोन रुग्ण कोरोनामुक्त; केईएम, शीव रुग्णालयातही होणार ‘प्लाझ्मा थेरपी’

657

मुंबईत महानगरपालिकेने कोरोना उपचारांसाठी सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी ‘प्लाझ्मा थेरपी’ला आता चांगलेच यश येऊ लागले असून नायर रुग्णालयात आणखी दोन रुग्ण या उपचार पद्धतीने ‘कोरोनामुक्त’ झाले आहेत. त्यामुळे या उपचार पद्धतीचा वापर वाढवण्यासाठी पालिकेच्या केईएम आणि शीव रुग्णालयातही ‘प्लाझा थेरपी’ सुरू करण्यात येणार आहे. याच्या परवानगीसाठी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रीसर्चला पत्र दिले असून दोन दिवसांत उत्तर अपेक्षित असल्याची माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली.

कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीच्या शरीरातून अँटिबॉडीज (प्रतिपिंडे) मिळवून तिचा वापर कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी करण्यात येतो. यासाठी पालिकेच्या मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात ‘प्लाझ्मा थेरपी केंद्र’ सुरू करण्यात आले आहे. यामध्ये आतापर्यंत चार रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे ही उपचार पद्धती आणखी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपचार पद्धतीसाठी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाच्या शरीरातील रक्तातून प्रतिपिंडे मिळवणे आवश्यक असते. यासाठी पालिकेला ‘डोनर’ मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यासाठी नायर आणि कस्तुरबा रुग्णालयातून कोरोनामुक्त झालेल्या 50 ते 60 जणांकडे ‘डोनर’साठी पाठपुरावा केला जात आहे. दरम्यान, नायर रुग्णालयात याआधीही ‘प्लाझ्मा थेरपी’ने दोन कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाल्यामुळे ‘प्लाझ्मा थेरपी’ने कोरोनामुक्त होणार्‍यांची संख्या चार झाल्याची माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली.

अशी होतेय कार्यवाही

  • ‘प्लाझ्मा थेरपी’साठी रुग्ण कोरोनामुक्त झालेला असला तरी प्रतिपिंडे मिळवण्यात येणारा रुग्ण प्रकृतीने ठीक असावा लागतो. शिवाय त्याला कोणतेही इतर आजार, प्रदीर्घ आजार नसावेत. त्याचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त नसावे. तर वजन किमान 50 किलो असावे लागते. प्लाझ्मा थेरपी करण्यात येणार्‍या रुग्णाशी ‘दात्या’चा ब्लड ग्रुप मॅच होणेही आवश्यक असते.
  • शिवाय डोनर तयार झाल्यानंतरही त्याच्या मधुमेह, एड्ससह रक्ताच्या आवश्यक चाचण्या, प्रवास व्यवस्थाही पालिकेच्या माध्यमातून करण्यात येतात. या उपचार पद्धतीसाठी दात्यांनीही मोठ्या संख्येने पुढे येणे आवश्यक आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांनी स्वत:हून पुढे यावे असे आवाहनही पालिकेकडून करण्यात आले आहे.

‘कोविड योद्धा’ मृत झाल्यास 50 लाख, वारसाला नोकरी

पालिकेच्या कोरोनाविरोधातील लढ्यात हजारो कर्मचारी-अधिकारी कोविड योद्ध्याचे काम करीत आहेत. मात्र पालिकेच्या एक हजाराहून जास्त कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर सुमारे 25 हून जास्त कर्मचार्‍यांचा मृत्यूही झाला आहे. दरम्यान, इतरांसाठी स्वत:चा जीव धोक्यात घालणार्‍या कर्मचार्‍यांना पालिका वार्‍यावर सोडणार नाही असे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सांगितले. कोविडसंबंधित कोणतेही काम करणार्‍या कर्मचार्‍याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास 50 लाख रुपये आर्थिक नुकसान भरपाई आणि कुटुंबातील एका वारसाला पालिकेत नोकरी देण्यात येणार असल्याचेही चहल म्हणाले. नियमित कर्मचार्‍यांसह कंत्राटी आणि कोविडसंबंधित कोणतेही काम करणार्‍या कर्मचार्‍यांना याचा लाभ मिळणार असल्याचे ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या