पालिका मुंबईत 25 हजार झाडे लावणार!

621

मुंबई महानगरपालिका 2020 या वर्षात ‘निसर्गाबरोबर मैत्री’ हा उपक्रम राबवणार असून त्या माध्यमातून मुंबईत 25 हजार झाडे लावण्यात येणार आहेत, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला भायखळा येथील महापौर निवासस्थानी महापौरांच्या हस्ते कडूनिंब, पिंपळ या वृक्षांचे वृक्षारोपण आज करण्यात आले.

मुंबईसारख्या अधिक वेगाने विकसित होणाऱ्या शहरांमध्ये वाढत्या शहरी प्रदूषणामुळे विविध प्रकारच्या जीवघेण्या नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मुंबईमध्ये पर्यावरणस्नेही वातावरण निर्मिती करणे, वृक्षारोपण जतन व संवर्धनाचे काम मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान खात्यामार्फत करण्यात येत असल्याचे महापौरांनी सांगितले. यावेळी सहायक आयुक्त (नियोजन) डॉ. संगीता हसनाळे, प्राणीसंग्रहालय संचालक डॉ. संजय त्रिपाठी, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी, साईप्रसाद पेडणेकर हे मान्यवर उपस्थित होते.

महत्वाचे

  • महानगरपालिकेच्या 24 विभागातील 1068 उद्याने/ मैदाने/ मनोरंजन मैदाने या ठिकाणी एकूण 25 हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.
  • महानगरपालिकेच्या एकूण 24 विभागांमध्ये 24 रोपवाटिका व दोन मुख्य रोपवाटिका आहे. या रोपवाटिकांमध्ये विविध प्रजातींची स्वदेशी, औषधी दुर्मिळ झाडे तयार करण्यात येत असून ही झाडे पालिकेच्या जमिनीवर लावण्यात येणार आहेत.
  • महानगरपालिका कार्यक्षेत्रात 2019 च्या वृक्षगणनेनुसार एकूण 29 लाख, 75 हजार 283 इतके वृक्ष अस्तित्वात असून 2008 च्या वृक्षगणनाच्या तुलनेत 55 टक्के इतकी वाढ झाली आहे.
  • मुंबईत लावण्यात येणाऱ्या वृक्षांमध्ये कदंब, कडूनिंब, जांभुळ, फणस, सीताफळ, डाळिंब, पिंपळ,  सीताअशोक व अशोक या वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.
आपली प्रतिक्रिया द्या