मंत्रिमंडळ विस्तारात शहरी-ग्रामीण समतोल

सामना प्रतिनिधी। मुंबई

राज्य मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार अखेर रविवारी झाला. राजभवनावर झालेल्या एका शानदार सोहळय़ात शिवसेनेचे जयदत्त क्षीरसागर, तानाजी सावंत आणि भाजपचे राधाकृष्ण विखे-पाटील, आशीष शेलार यांच्यासह 13 जणांना मंत्री पदाची शपथ देण्यात आली. मंत्रिमंडळ विस्तारात शहरी आणि ग्रामीण भागाचा समतोल साधण्याचा प्रयत्न युती सरकारने केला आहे. दरम्यान, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्यासह सहा जणांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे.

राजभवनातील हिरवळीवर सकाळी 11 वाजता हा शपथविधी सोहळा पार पडला. आठ कॅबिनेट मंत्री आणि पाच राज्यमंत्र्यांना राज्यपाल डॉ. विद्यासागर राव यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली. विधानसभा निवडणूक चार महिन्यांनी होईल. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाचा हा अखेरचा विस्तार होता.
मुलाच्या उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये बंड करणारे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंत्री पदाची शपथ घेतली आणि भाजपात प्रवेश केला. तर बीडच्या राजकारणात वजनदार नेते मानले जाणारे शिवसेनेचे जयदत्त क्षीरसागर आणि विधान परिषद सदस्य तानाजी सावंत यांनाही कॅबिनेट मंत्री पद मिळाले आहे. सावंत हे शिवसेनेचे धाराशीव, सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख आहेत.

‘यांच्या’ हाती नारळ
एमपी मिल कंपाउंड गृहनिर्माण प्रकल्पात लोकायुक्तांनी ठपका ठेवल्याने प्रकाश मेहता यांना मंत्री पद गमवावे लागले आहे तर राजकुमार बडोले, प्रवीण पोटे, राजे अंबरीश अत्राम, दिलीप कांबळे यांनाही नारळ मिळाला आहे. विष्णू सावरा यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा दिल्याचे सांगितले जाते. हे सर्व मंत्री भाजपचे आहे. शपथविधी सोहळय़ाआधीच या मंत्र्यांचे राजीनामे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले आणि ते मंजूर केले.

मुख्यमंत्री म्हणतात…
कोणी खूपच वाईट काम केले किंवा कोणावर आरोप झाले म्हणून त्या सहा मंत्र्यांना वगळले असे बिलकूल नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. सरकारचे चार-सहा महिने राहिलेले असताना मंत्रिमंडळाचा विस्तार कशासाठी, असे काही जण विचारतात. मात्र आगामी निवडणुकीनंतरही आमचेच सरकार राहणार आहे. म्हणूनच काही नव्या लोकांना संधी द्यायची होती. काही प्रादेशिक राजकारणाची गणिते असतात. त्याचा विचार करून आधी काही जणांना संधी दिली. त्यानंतर आता दुसऱयांना संधी दिली, असे मुख्यमंत्री म्हणाले.