मुंबई सेंट्रल आणि ग्रँट रोड दरम्यान 140 कोटींचा सहापदरी केबल ब्रिज

887

मुंबई सेंट्रल आणि ग्रँटरोड स्थानकादरम्यान असलेल्या 127 वर्षे जुन्या ब्रिटीशकालीन तीन पदरी बेलासिस उड्डाण पुलाचा पुनर्विकास करून त्या जागी सहा पदरी केबल ब्रिज उभारण्याची योजना महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने (एमआरआयडीसी)आखली आहे. या पुलामुळे ताडदेव आणि नागपाडा जंक्शनमधील वाहतूक कोंडी दूर होणार असून त्यासाठी 140 कोटीचा खर्च येणार आहे. एमआरआयडीसीने मुंबई शहरातील 11 उड्डाणपुल आणि 1 भुयारी पुल बांधण्यासाठी मुंबई महानगर पालिकेशी 14 जुलै रोजी सामंजस्य करार केला आहे. भायखळा, रे रोडच्या उड्डाण पुलाच्या जागी देखील केबल स्डेएड उड्डाणपुलाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.

सध्याचा बेलासिस उड्डाण पुल तीन पदरी असून पुलाची एकूण लांबी स्टील गर्डरच्या सुपरस्ट्रक्चर आणि ऍप्रोचसह 380 मीटर इतकी आहे. नव्या पुलामुळे मुंबई सेंट्रल स्थानकाच्या पश्चिमेकडील ताडदेव जंक्शन आणि पूर्वेकडील नागपाड जंक्शनवरील वाहतूक कोंडी दूर होणार आहे. तीन लेनच्या जागी नवा ब्रिज सहा लेनचा होणार असून त्यामुळे र्ट्रॅफिकची समस्या कायमची दूर होणार असल्याचे एमआरआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जायसवाल यांनी सांगितले.

इमारतींना धक्का न लावता पुनर्विकास

प्रस्तावित नव्या पुलाची सुरूवात आणि शेवट जुन्या पुलाप्रमाणेच असेल. जुना पुल पाडताना कमीत कमी रेल्वे ब्लॉक घ्यावे लागतील अशी योजना आहे. सध्याच्या पुलाची रेल्वे लाइनपासूनची आवश्यक अंतराची मंजूरी केवळ पाच मीटर इतकी असून नवा ब्रिज 6.5 मीटर इतक्या सुरक्षित अंतरावर असणार आहे. प्रस्तावित ब्रिजला केबलचा आधार असल्याने त्याचे खांब रेल्वे हद्दीच्या बाहेर येतील त्यामुळे रेल्के नजिकच्या इमारतींना धक्का लावण्याची गरज राहणार नाही. टॉवर क्रेन उभारण्याकरीता सीपफॉर्म ठेवण्यासाठी लागणारी जागाही इमारतींना बाधा आणणारी नसेल. सुपरस्क्ट्रचर स्टीलच्या गर्डरची निर्मिती एकाच वेळी फॅब्रिकेशन कारखान्यात सुरू राहील आणि घटनास्थळी त्याची रवानगी होईल.

सेल्फी पॉईंट आणि नेत्रदीपक रोषणाई

हा ब्रिज सर्क मंजूरी मिळाल्यानंतर 650 दिवसांत बांधून तयार करण्याची योजना आहे. या ब्रिजवर नागरीकांना आकर्षणाचे केंद्र म्हणून ‘सेल्फी पॉईंट’ उभारण्याची योजना आहे. तसेच रात्रीचा हा ब्रिज नेत्रदीपक दिसण्यासाठी त्यावर आर्कीटेक्चरल एलईडी लाईटींग करण्यात येणार असून ती रिमोटआधारे संचलित होणारी असेल.

आपली प्रतिक्रिया द्या