कारण असेल तरच मुंबईकरांनी जिल्ह्यात या, रत्नागिरी जिल्हाधिकारी मिश्रा यांचे कळकळीचे आवाहन

गेल्या दोन दिवसात रत्नागिरी जिल्ह्यात 939 कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढणारी संख्या आणि मृत्यूचे प्रमाण पाहीले तर ती चिंताजनक गोष्ट ठरली आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे मुंबईतून चाकरमानी गावी येऊ लागले आहेत. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी या गोष्टीची गंभीर दखल घेत कारण नसेल तर मुंबईकरांनी गावाला येऊ नये असे कळकळीचे आवाहन केले आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे़.

मुंबईकरांनी कारण नसताना जिल्ह्यात येऊ नये असे आवाहन करताना जिल्ह्यात मुंबईसह इतर ठिकाणांहून येणाऱ्या व्यक्तींची चेकपोस्टवर तपासणी करण्यात येणार आहे़. प्रत्येकाला आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. रुग्णांची संख्या अशीच वाढत राहीली तर 30 एप्रिलपर्यंत रुग्णसंख्या चौपट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रेल्वेने येणार्‍या प्रवाशांची स्थानकातच कोरोना चाचणी

कोकण रेल्वेने जिल्ह्यात येणार्या प्रवाशांची कोरोना चाचणी रत्नागिरी रेल्वेस्थानकातच करण्यात येणार आहे़. त्याकरीता 30 कर्मचार्यांचे एक पथक रेल्वेस्थानकावर तैनात ठेवण्यात येणार आहे. हे पथक 24 तास कार्यरत राहणार असून तपासणीनंतर जे प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह सापडतील त्यांना कोविड सेंटरला पाठवण्यात येणार आहे आणि उर्वरित प्रवाशांना गृह विलगीकरणात ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी सांगितले़. डॉ. जाखड यांनी कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी जि.प.उपाध्यक्ष उदय बने, कोकण रेल्वे क्षेत्रिय प्रबंधक उपेंद्र शेंडे उपस्थित होते़. कोकण रेल्वे व्यवस्थापनामध्ये येणार्‍या आणि जाणार्‍या प्रवाशांच्या संख्येची माहिती जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणि पोलीस यंत्रणेकडे प्राप्त करुन घेतली जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या