मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी मराठा कार्ड? ‘या’ दोघांमध्ये चुरस

1310
congress

पुढील दोन वर्षांत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळय़ासमोर ठेवत काँग्रेसने मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी मराठा कार्ड चालवण्याची तयारी सुरू केली आहे.  त्यामुळे  मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी भाई जगताप आणि सचिन सावंत यांच्यात सध्या चुरस दिसत आहे. अमरजित सिंग मनहास आणि चरणजित सप्रा यांच्या समर्थकांनीही लॉबिंग सुरू केले आहे.

मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष एकनाथ गायकवाड  यांची मुलगी वर्षा गायकवाड यांच्याकडे महाराष्ट्र विकास आघाडीतील शिक्षणमंत्री पदाची जबाबदारी सोपवली आहे. मुलीला मंत्रीपद दिल्यास तुम्हाला मुंबई अध्यक्षपदावर ठेवता येणार नाही, अशी अट काँग्रेसच्या श्रेष्ठाRनी घातली होती. एकाच घरात दोन पदे मिळणार नाहीत, असे काँग्रेसच्या नेत्यांनी पूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे गायकवाड यांना लवकरच कार्याध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागणार आहे. त्यापूर्वी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी नव्या चेहऱ्याचा शोध सुरू झाला आहे.

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे मागील आठवडय़ात मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यावेळी मुंबई काँग्रेसला बळकट करण्यासाठी अमरजितसिंग मनहास यांची नियुक्ती करावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते जनार्दन चांदूरकर, चंद्रकांत हंडोरे, बलदेव खोसा, युसुफ अब्राहनी, झाकीर अहमद, राजन भोसले, वीरेंद्र उपाध्याय, उपेंद्र दोशी आदींनी केली. यूथ काँग्रेस व काँग्रेसच्या महिला आघाडीच्या नेत्यांनीही मनहास यांचे नाव सुचवल्याचे सांगण्यात येते. हा सर्व गट गुरुदास कामत यांचा गट म्हणून काँग्रेसमध्ये ओळखला जातो.

पण दुसरीकडे आमदार भाई जगताप तसेच चरणजित सप्रा आणि सचिन सावंत यांच्या समर्थकांनीही लॉबिंग सुरू केले आहे. भाई जगताप यांच्या नावासाठी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा आग्रही आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची पसंतही भाई जगताप यांना मिळण्याची चिन्हे आहेत. तर चरणजित सप्रा यांच्या नावासाठी मुंबई काँग्रेसचेच माजी अध्यक्ष संजय निरुपम आग्रही आहेत. मात्र  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे शब्द टाकला आहे असे सांगण्यात येते. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल.

आपली प्रतिक्रिया द्या