मुंबईत संसर्गाचा कालावधी पोहोचला 132 दिवसांवर; पालिका, राज्य सरकारच्या प्रयत्नांना यश

कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने राबवलेली ‘चेसद व्हायरस’, ‘मिशन झिरो’बरोबरच राज्य सरकारच्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेला यश येत असून मुंबईत कोरोना संसर्गाचा कालावधी आता सरसकट 132 दिवसांवर गेला आहे.

कोरोनाविरोधात विविध मोहिमांच्या माध्यमातून पालिकेने उभारलेल्या भक्कम तटबंदीमुळे गणेशोत्सवानंतर वाढलेली रुग्णसंख्या कमी करून संसर्गाचा धोका कमी करण्यास पालिकेला मोठे यश आले आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी पालिकेने सुरुवातीपासून अहोरात्र प्रयत्न सुरू असले तरी मुंबईत सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचे रुग्ण वाढले. गणेशोत्सवानंतर कोरोना रुग्णांचे संख्या झपाटय़ाने वाढली. मात्र, पालिकेच्या ‘चेस द व्हायरस’ आणि ‘मिशन झिरो’पाठोपाठ राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमांमुळे कोरोनाला रोखण्यात पालिकेला मोठय़ा प्रमाणात यश आले आहे.

त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणारे आणि थुंकणाऱयांविरोधातील कारवाईमुळे मुंबईकरांमध्ये जबाबदारीचे भान वाढले. त्यामुळेच गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या तब्बल 2 हजारांच्या पुढे पोहोचलेली रुग्णसंख्या आता 1 हजार ते 1200वर स्थिरावली आहे.

कोरोना संसर्गाचा कालावधी 132 दिवसांत पोहोचला असून पालिकेच्या 24 विभागांपैकी 23 विभागातही हा कालावधी 100 दिवसांच्या पुढे गेला आहे. मात्र, आर/दक्षिण विभागात हा कालावधी 97 दिवसांवर पोहोचला आहे.

परळ-लालबाग, शिवडीत सर्वाधिक सुधारणा

पालिकेच्या एफ/दक्षिण विभागाची लक्षणीय कामगिरी सुरूच आहे. या विभागात येणाऱया परळ-लालबाग, शिवडी, नायगाव पूर्व, काळाचौकी या विभागांत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून आता तब्बल 256 दिवसांवर पोहोचला आहे. या विभागात रुग्ण वाढीचा सरासरी दरही 0.27 टक्के असा असून हा मुंबईतील सर्वात कमी दर आहे.

मोठय़ा प्रमाणात अनलॉक होऊनही कोरोना रोखण्यासाठी पालिकेने केलेल्या कठोर उपाययोजनांमुळे कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली. त्याचबरोबर संसर्गाचा कालावधीही 132 दिवसांवर पोहोचला आहे. मात्र, आगामी दिवाळीसह इतर सणासुदीच्या काळात लोकांनीही सार्वजनिक ठिकाणी फिरताना पालिका आणि राज्य सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करावे.’
– सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त

आपली प्रतिक्रिया द्या