मुंबईकरांची पोटपूजा 24 तास सुरु राहणार; झोमॅटो, स्विगीकडून खाद्यपदार्थांचे पार्सल घरपोच मागवता येणार

कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने निर्बंधात वाढ केली असली तरी आता झोमॅटो, स्विगीसारख्या ऑनलाईनने खाद्यपदार्थ आणि ई-कॉमर्सच्या वस्तू 24 तास मागवता येणार असून शुक्रवार ते सोमवारपर्यंतच्या कडक लॉकडाऊनच्या कालावधीतही त्यावर कोणतेही बंधन असणार नाही. मुंबई पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी आज याबाबतचे सुधारित परिपत्रक जारी केले.

मुंबईत वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने निर्बंधात वाढ केली असून दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू केली आहे. मात्र, फळे विक्रेते, मेडिकल, किराणा विक्रेते यांना निर्बंधांतून वगळण्यात आले आहे. उपहारगृहे बंद ठेवण्यात आली असून त्यांची पार्सल सेवा मात्र सुरू ठेवण्यात आली आहे. मात्र, शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून ते सोमवार सकाळ 7 वाजेपर्यंतच्या निर्बंधादरम्यान, उपहारगृहातील पार्सल सेवा बंद ठेवण्यात आली असून या कालावधीत घरपोच सेवा देण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर शुक्रवार ते सोमवारच्या निर्बंधांच्या काळात रस्त्यावरील खाद्यपदार्थ तसेच फळांच्या स्टॉल्सना पार्सल किंवा सुरक्षित अंतर ठेवून विक्री करता येणार आहे.

घरकामगार, चालक, स्वयंपाकी, परिचारिकांना नाईट कर्फ्यूतून सूट

हातावर पोट असलेले घरकामगार तसेच स्वयंपाकी, चालक, परिचारिका, ज्येष्ठ आणि आजारी व्यक्तींची सेवा करणाऱया व्यक्तींना नाईट कर्फ्यूमधून वगळण्यात आले आहे. त्यांना आठवडाभर सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत काम करायला सुट देण्यात आली आहे. दरम्यान, डोळ्यांचे क्लिनिक आणि चश्यांच्या दुकानांना राज्य सरकारने नेमून दिलेल्या वेळेतच काम करता येणार आहे.

  • निर्बंधांच्या काळात विद्यार्थी, स्पर्धा परिक्षार्थींना त्यांच्या परीक्षा देता येणार आहेत.
  • सार्वजनिक ठिकाणी प्रवास करताना त्यांचे हॉल तिकीट ग्राह्य धरले जाणार आहे. मात्र, त्यांच्याबरोबर पालक असणे बंधनकारक आहे.
आपली प्रतिक्रिया द्या