आजपासून 30 ते 44 वयोगटासाठी लसीकरण, केंद्राच्या मोफत लसीकरणाला देशभर सुरुवात

केंद्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे देशभरात उद्या सोमवार, 21 जूनपासून 18 ते 44 वयोगटासाठी मोफत लसीकरण सुरू होणार आहे. मात्र, गर्दी टाळण्यासाठी मुंबईत 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणाचे 18 ते 29 आणि 30 ते 44 असे गट करण्यात आले असून उद्यापासून केवळ 30 ते 44 वयोगटासाठी पालिका-राज्य सरकारच्या 149 केंद्रांवर लसीकरण होणार आहे. यातील 50 टक्के लसीकरण वॉक इन तर 50 टक्के नोंदणी पद्धतीने होणार आहे, अशी माहिती अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. तिसऱया टप्प्यातील 18 ते 44 हा वयोगट हा सर्वात मोठय़ा लोकसंख्येचा टप्पा आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिका अहोरात्र मेहनत घेत असून कोरोना चाचण्या आणि लसीकरणावर भर देण्यात येत आहे. खासगी रुग्णालये आणि त्यांच्या लसीकरण केंद्रांमध्ये शुल्क आकारून लसीकरण सुरू आहे. मात्र, लसीच्या तुटवडय़ामुळे सुरू करण्यात आलेले 18 ते 44 या वयोगटातील लसीकरण बंद ठेवण्यात आले होते, पण आता महिनाभराच्या ब्रेकनंतर मोफत लसीकरण सुरू होणार आहे. मात्र या गटातील लोकसंख्या खूप मोठी असल्यामुळे या लसीकरण मोहिमेचे दोन गट करण्यात आले आहेत. पहिल्या गटात 18 ते 29 वयाच्या व्यक्ती तर दुसऱया गटात 30 ते 44 वयोगटातील व्यक्ती असणार आहेत. सोमवारपासून 30 ते 44 वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण होणार आहे.

महिनाभरानंतर लसीकरण सुरू

मुंबईत 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण सुरू करण्यात आले होते. मात्र, लसीच्या तुटवडय़ामुळे सुमारे महिनाभराच्या ब्रेकनंतर सोमवार, 21 जूनपासून 18 ते 44 वयोगटातील 30 ते 44 वयोगटासाठी लसीकरण सुरू होणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून मुंबई महापालिकेला रविवारी 1 लाख 11 हजार लस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे तिसऱया टप्प्यातील 18 ते 44 या गटाचे लसीकरण पुन्हा सुरू होणार आहे. मात्र, खासगी रुग्णालये आणि त्यांच्याकडून सुरू करण्यात आलेल्या लसीकरण केंद्रांवर 18 ते 44 वयोगटातील सशुल्क लसीकरण सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या