मुंबईकरांसाठी `बेस्ट’च्या मदतीला `लाल परी’ धावली!

लोकल बंद असल्याने कामावर पोहोचण्यासाठी तासन्तास प्रवासात रखडणाऱ्या मुंबईकरांसाठी ‘बेस्ट’च्या मदतीला आता ‘एसटी’ धावून आली आहे. यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या तब्बल 250 बस नोकरदारांच्या प्रवासासाठी ‘बेस्ट’कडे उपलब्ध होणार आहेत. ‘एसटी’कडून ड्रायव्हर-कंडक्टरसह भाडेतत्त्वावर या बस घेतल्या जाणार असून यासाठी प्रतिकिमी ७५ रुपये महामंडळाला इंधन, मेंटेनन्स, ड्रायव्हर आणि कंडक्टरच्या खर्चासाठी दिले जाणार आहेत.

मुंबईसह राज्यभरात ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत लॉकडाऊन शिथील केल्याने अनेक उद्योगधंदे, कंपन्या, कार्यालये सुरू झाल्या आहेत. त्यामुळे गेल्या सहा-सात महिन्यांपासून घरात असलेला नोकरदार कामावर जाऊ लागला आहे. मात्र लोकल बंद असल्याने आणि बसमध्ये सुरक्षित गर्दी करण्यास मनाई असल्याने कामावर जाणाऱ्या नोकरदारवर्गाला तासन्तास प्रवासात रखडावे लागत आहे. या पाश्र्वभूमीवर नोकरदारांच्या सोयीसाठी ‘बेस्ट’ राज्य परिवहन महामंडळाकडून २५० गाड्या भाडेतत्त्वावर घेत आहे. यामुळे विरार, ठाणे, बदलापूर, पनवेल, वसई, कल्याण, डोंबिवली अशा ठिकाणाहून मुंबईत येणाऱ्या नोकरवर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, खासगी बस चालकांनीही बेस्टला हजार गाड्या भाड्याने घ्याव्यात असा प्रस्ताव दिला.

…म्हणूनच घेतला निर्णय

पालिकेच्या बेस्ट उपक्रमाकडे सध्या ३५६० बस आहेत. यातील तीन हजार बस प्रवाशांच्या सेवेसाठी धावत आहेत. यातच प्रवासी संख्या १६ लाखांच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे या उपलब्ध बसेसवर ताण वाढत आहे. त्यामुळे एसटीकडून भाडेतत्त्वावर बस घेण्यात आल्या आहेत. ही सुविधा लवकरच सुरू होणार असल्याची माहिती ‘बेस्ट’ प्रशासनाकडून

या आगारातून आणणार बस

‘एसटी’कडून भाडेतत्त्वावर घेण्यात येणाऱ्या गाड्यांमध्ये

नाशिक-2 आगार- 30  बसेस,

मनमाड आगार – 20 बसेस,

सटाणा आगार-25 बसेस,

सिन्नर आगार – 30 बसेस,

इगतपुरी आगार – 20 बसेस,

लासलगाव आगार – 20 बसेस,

कळवण आगार – 25 बसेस,

पेठ आगार -15 बसेस,

येवला आगार – 10 बसेस,

पिंपळगाव आगार – 20 बसेस,

मालेगाव आगार – 10 बसेस

नांदगाव आगाराकडून 15 बसेस घेण्यात येणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या