एच/पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांचे निधन

930

वांद्रे पूर्व, सांताक्रुझ पूर्व, खार पूर्वमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यात मोठे योगदान असलेले एच/पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार (57) यांचे आज फोर्टिस रुग्णालयात कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात्‌ पत्नी, दोन मुले, सून, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, पालिकेच्या एच/पूर्व विभागात वाढणारी रुग्णांची संख्या आणि संसर्ग नियंत्रणात आणण्यात अशोक खैरनार यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या प्रयत्नांमुळेच एच/पूर्व या विभागात रुग्णवाढ दुप्पट होण्याचा कालावधी 134 दिवसांवर पोहोचला आणि येथील रूग्ण वाढीचा सरासरी दरही 0.5 टक्क्यांवर आला. अशी कामगिरी करणारा एच/पूर्व हा मुंबईतील पहिला विभाग ठरला होता.

खैरनार हे मूळचे धुळयातील मोहाडीचे राहणारे होते. त्यांचे शालेय शिक्षण मोहाडीमध्येच झाले. विद्युत शाखेतील पदविका शिक्षण त्यांनी धुळे शहरातील शासकीय तंत्रनिकेतन येथून पूर्ण केले. त्यानंतर मुंबईतील व्हीजेटीआय महाविद्यालयातून त्यांनी अभियांत्रिकीय पदवी आणि ‘आयआयटी, मुंबई’ या सुविख्यात संस्थेतून त्यांनी पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. खैरनार हे फेब्रुवारी 1988 पासून मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत होते. जानेवारी 2018 पासून ते सहाय्यक आयुक्तपदी कार्यरत होते. ‘जी/उत्तर’ विभागाचे सहाय्यक आयुक्त असताना, महापरिनिर्वाण दिनानिमित्त केलेल्या विशेष कामगिरीचा गौरव म्हणून खैरनार यांना तत्कालीन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या हस्ते जानेवारी 2019 साठी ‘ऑफीसर ऑफ द मंथ’ या विशेष बहुमानाने सन्मानित करण्यात आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या