कोरोना रुग्णांना ‘बोलस डोस’ देऊ नका! रिऍक्शन टाळण्यासाठी नायर रुग्णालयाचे परिपत्रक

393

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी सलाईनमधून दिल्या जाणाऱ्या ‘बोलस डोस’मुळे रिऍक्शन होऊन रुग्णाच्या जीवाला धोका पोहोचण्याची शक्यता असल्यामुळे हा डोस देऊ नये, असे परिपत्रक नायर रुग्णालयाने काढले आहे. ‘आयसीयू’मध्ये असलेल्या रुग्णाची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी बोलस डोस दिला जातो.

मुंबईत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात असून त्यांच्यावर मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात आयसीयू तसेच आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. अशा रुग्णांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सलाईनमधून अँटीबायोटिक औषधांचा बोलस डोस दिला जातो. सलाईनमधून दिल्या जाणाऱ्या बोलस डोसमध्ये औषधाचे ड्रिपिंग जास्त होत असते. त्यामुळे रुग्णाच्या जीवाला धोका पोहोचू शकतो. मात्र, हा धोका टाळण्यासाठी रुग्णाला सलाईनमधून अँटीबायोटिक औषधांचा डोस देताना बोलस डोस न देता धीम्या गतीने शरीरात जाणारा ‘स्लो डोस’ द्यावा. त्यामुळे रुग्णाच्या शरीरात औषध जलद गतीने न जाता हळूहळू भिनेल आणि त्याचा जास्त फायदा रुग्णाला मिळेल, असे नायर रुग्णालयाचे डीन डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले. डॉक्टर आणि परिचारिका यांनी कोरोना रुग्णांना अँटिबायोटिक औषधांचा डोस कसा द्यावा, याबाबतचे परिपत्रक डॉ. जोशी यांनी जारी केले आहे.

परिपत्रकात काय म्हटले आहे

बोलस डोसची अलर्जीक रिऍक्शन सर्वसाधारण रुग्णांवरही होते. त्यामुळे कोरोना रुग्णांना रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या औषधांचा बोलस डोस देऊ नये. अँटिबायोटिक औषधे, टोसिलीझुंमाब, इटोलिझुमाब, रेमडेसीवर, मेथल प्रीडनीसोलोन या औषधांचा सलाईनमधून स्लो डोस द्यावा, असे परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या