दिलासादायक! मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी 15 दिवसांत 31 दिवसांनी वाढला

मुंबईत पालिकेच्या माध्यमातून कोरोना रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांमुळे रुग्णसंख्या चांगलीच आटोक्यात येत असून रुग्ण दुपटीचा कालावधी वेगाने वाढत आहे. मुंबईत 4 ऑक्टोबर रोजी 64 दिवस असणारा रुग्ण दुपटीचा कालावधी 18 ऑक्टोबर रोजी तब्बल 31 दिवसांनी वाढून 95 दिवसांवर पोहोचला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेत’ घरोघरी तपासणी-सर्वेक्षणाच्या प्रभावी
अंमलबजावणीमुळेच हे यश येत आहे.

मुंबईत मार्चमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर वेगाने रुग्णसंख्या वाढत गेली. मात्र पालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे ऑगस्टमध्ये कोरोना चांगलाच नियंत्रणात आला. 26 ऑगस्टला रुग्ण दुपटीचा कालावधी 96 दिवसांवर गेला होता. मात्र ऑगस्टअखेर आणि संपूर्ण सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या चांगलीच वाढत गेली. दैनंदिन रुग्णसंख्या अडीच हजारांवर गेली. 12 सप्टेंबरला तर दुपटीचा कालावधी तब्बल 58 दिवसांपर्यंत खाली आला. मात्र यानंतर कोरोना नियंत्रणासाठी 15 सप्टेंबरपासून पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्या नियोजनानुसार ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे चांगलेच यश येऊ लागले आहे. 19 ऑक्टोबरपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 2,43172 वर पोहचली असली तरी आतापर्यंत 2 लाख 12 हजार 905 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर 9776 रुग्णांचा मृत्य़ू झाला आहे. त्यामुळे सध्या मुंबईत 18624 असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 87 टक्क्यांवर पोहोचला आहे.

सरासरी रुग्णवाढही घटतेय

मुंबईत सध्या सध्या सरासरी रुग्णवाढही चांगलीच कमी होत आहे. 4 ऑक्टोबर रोजी सरासरी वाढ 1.09 टक्के होती. हे प्रमाण गेल्या 15 दिवसांत चांगलेच कमी होत आले आहे. यामध्ये 10 ऑक्टोबर रोजी सरासरी वाढ 1.01 टक्क्यांवर, 12 ऑक्टोबर रोजी 0.97 टक्क्यांवर, 15 ऑक्टोबर रोजी 0.85 टक्क्यांवर, 17 ऑक्टोबर रोजी 0.77 टक्क्यांवर आणि 18 ऑक्टोबर रोजी 0.73 टक्क्यांपर्यंत खाली आहे.

दहा दिवसांतील रुग्ण दुपटीची वाढ

 • 9 ऑक्टोबर 67 दिवस
 • 10 ऑक्टोबर 69 दिवस
 • 11 ऑक्टोबर 69 दिवस
 • 12 ऑक्टोबर 71 दिवस
 • 13 ऑक्टोबर 73 दिवस
 • 14 ऑक्टोबर 88 दिवस
 • 15 ऑक्टोबर 82 दिवस
 • 16 ऑक्टोबर 86 दिवस
 • 17 ऑक्टोबर 90 दिवस
 • 18 ऑक्टोबर 95 दिवस

कोरोना चाचण्या वाढल्या

 • ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेत कोरोना चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले. दैनंदिन चाचण्या 15 ते 18-20 हजारांपर्यंत वाढवण्यात आल्या असून सव्वा महिन्यात पावणेचार लाख चाचण्या करण्यात आल्या.
 • मार्चपासून 11 सप्टेंबरपर्यंत मुंबईत एकूण 8 लाख 87 हजार तर 11 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबरपर्यंत तब्बल 3 लाख 74 हजार चाचण्या झाल्या.
आपली प्रतिक्रिया द्या