14 पैकी 10 उमेदवार निवडून आले; बाळ महाडदळकर गटाचे वर्चस्व

मुंबई क्रिकेट असोसिएशनची (एमसीए) निवडणूक शुक्रवारी पार पडली. या निवडणुकीत बाळ महाडदळकर गटाचे वर्चस्व दिसून आले 14 पैकी 10 जागांवर त्यांचेच उमेदवार जिंकून आले. विजय पाटील यांची अध्यक्षपदी, अमोल काळे यांची उपाध्यक्षपदी आणि संजय नाईक यांची सचिवपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर शुक्रवारी सहसचिव पदासाठी झालेल्या मतदानात शाहआलम शेख यांनी 196 मतांसह संगम लाड (121 मते) यांचा पराभव केला, तर खजिनदार पदासाठी झालेल्या लढतीत जगदीश आचरेकर (189 मते) यांच्याकडून मयांक खांडवाला (128 मते) यांचा पराभव झाला. विजय पाटील यांनाही बाळ महाडदळकर गटाचा पाठिंबा होता. या असोसिएशनमधील महत्त्वाच्या पाचही पदांवर बाळ महाडळकर गटातील उमेदवारांचीच वर्णी लागली. आता जिंकून आलेले सर्व उमेदवार 2019 ते 2022 या कालावधीत एमसीएचा कार्यभार सांभाळतील.

  • डॉ. उन्मेष खानविलकर हे गेल्या निवडणुकीत सहसचिव म्हणून निवडून आले होते. यंदा मात्र ते कोणत्याही पॅनेलमधून उभे न राहता स्वतंत्र उभे राहिले. त्यांना या वर्षीच्या निवडणुकीत सर्वाधिक 241 मते मिळाली. त्यांची व्यवस्थापकीय समितीत निवड झाली.
  • बाळ महाडदळकर गटातील पाच उमेदवार व्यवस्थापकीय समितीच्या निवडणुकीत जिंकून आले. प्रताप सरनाईक यांचे सुपुत्र विहंग सरनाईक (165 मते), अभय हडप (160 मते), अजिंक्य नाईक (201 मते), गौरव पय्याडे (180 मते), खोदादाद याजदेगर्दी (133 मते) या पाचही जणांचा एमसीएच्या कार्यकारिणीत समावेश झालाय. युनायटेड फॉर चेंज या गटातून नदीम मेमन यांचा विजय झाला. त्यांना 140 मते मिळाली. अमित दाणी (144 मते), कौशिक गोडबोले (157 मते) यांना स्वतंत्र उभे राहूनही यश संपादन करता आले.

एमसीएची नवी कार्यकारिणी

अध्यक्ष – विजय पाटील, उपाध्यक्ष – अमोल काळे, सचिव – संजय नाईक, सहसचिव – शाहआलम शेख, खजिनदार – जगदीश आचरेकर

व्यवस्थापकीय समिती

विहंग सरनाईक, अभय हडप, डॉ. उन्मेष खानविलकर, गौरव पय्याडे, कौशिक गोडबोले, नदीम मेमन, खोदादाद याजदेगर्दी, अमित दाणी, अजिंक्य नाईक

संजय नाईक करणार एमसीएचे प्रतिनिधित्व

एमसीएच्या नव्या कार्यकारिणीची बैठक निवडणुकीनंतर आटोपली. यामध्ये सचिवपदी नियुक्त झालेले संजय नाईक यांची बीसीसीआयच्या निवडणुकीत एमसीएचे प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली. त्या निवडणुकीत संजय नाईक मतदान करतील.

मुंबईतील गुणवत्ता शोधणार

मुंबईतील सर्व प्रकारच्या क्रिकेटला पुढे आणण्याचे काम आम्ही करणार आहोत. यामध्ये शालेय, कॉलेज, कॉर्पोरेट अशा प्रकारच्या क्रिकेटचा समावेश आहे. मुंबईने देशाला एकापेक्षा एक क्रिकेटपटू दिलेत. अशा दिग्गज क्रिकेटपटूंकडून टीप्स घेणार आहोत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मुंबईतील गुणवत्ता शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे विजय पाटील यावेळी आवर्जून म्हणाले.

वेंगसरकर, पाटील, तेंडुलकर, अमरे यांनी मतदानाचा हक्क बजावला

एमसीएच्या निवडणुकीत पहिल्यांदाच माजी क्रिकेटपटूंनी मतदान केले. दिलीप वेंगसरकर, संदीप पाटील, सचिन तेंडुलकर, प्रवीण अमरे, विनोद कांबळी, संजय बांगर, झहीर खान, रमेश पोवार, नीलेश कुलकर्णी, जतीन परांजपे, समीर दिघे यांच्यासह सुधीर नाईक, उमेश कुलकर्णी आणि मिलिंद रेगे यांनी मतदानाचा हक्क बजावला.

आपली प्रतिक्रिया द्या